संतप्त शहरवासीयांचा सवाल : प्रलंबित समस्यांकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी सांभाळणारा आशिया खंडातील मोठा दारूगोळा भांडार येथे आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर, नाचणगाव येथे असणारे वैभवशाली भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारी ऐतिहासिक वास्तू आहे. बंद पडलेला वस्त्रोद्योग असून पुलगाव तहसीलचा प्रश्न ताटकळत आहे. हे सर्व प्रश्न सुटत नसल्याने पुलगाव शहर आणखी किती काळ उपेक्षित राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून गणल्या गेलेले पुलगाव व लगतचे भासलेकालीन इतिहासाची साक्ष देणारे नाचणगाव या गावाची लोकसंख्या जवळपास ६० हजारांवर आहे. इंग्रज राजवटीत या परिसराचे महत्त्व इंग्रजी शासनाला कळले म्हणून त्यांनी शहरा नजीकचे कवठा (रेल्वे) या गावात जिल्ह्याचे स्थान देऊन सोरटा येथे पोलीस ठाणे दिले. १८६५ च्या दरम्यान वर्धा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधून या गावाला ब्रीज टाऊन पुलाचे गाव पुलगाव, असे नाव दिले. इंग्रजी सत्ता असताना या शहरातून त्यांनी पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्ग सुरू करून दळणवळणाचा मार्ग खुला केला. १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने या शहरात पुलगाव कॉटन मिल या वस्त्रोद्योगाची स्थापना केली. पूढे १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना झाली. शहराची भौगोलिक स्थिती पाहता १९४२ साली आशिया खंडातील सर्वात मोठ्या केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करण्यात आल्यानंतर या शहराला विकासाची गती आली. यामुळे दिल्लीच्या गोलियन कंपनीद्वारे विदर्भ सुपर फॉस्फेट या खत कारखान्याची स्थापना करून शेकडोंना रोजगार मिळवून दिला; पण मागील दोन दशकात राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहराकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरविली व या शहराच्या विकासाला खीळ बसली. विदर्भ सुपर फॉस्फेट खत कारखाना बंद पडला. तो बिलासपूर फर्टिलाईझर कपंनीद्वारे विकत घेत पुन्हा २०० कामगारांना रोजगार मिळाला असला तरी आज हा कारखानाही बंद पडण्याचे मार्गावर आहे. ३५०० कामगारांना रोजगार देणारा पुलगाव कॉटन मिल २००३ मध्ये बंद पडला. दशकापूर्वी तोच वस्त्रोद्योग जयभारत टेक्सटाईल्स नावाने नव्याने सुरू होऊन जवळपास ४०० युवकांना रोजगार मिळाला असला तरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. एक दशकापुर्वी पुलगाव-आर्वी रेल्वे गाडी बंद झाली. ती सुरू करणे दूरच; पण १० वर्षांपासून नवजीवन व ओखापूरी एक्स्प्रेसला पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रलंबित आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पुलगाव शहर किती काळ उपेक्षित राहणार
By admin | Published: May 12, 2017 12:58 AM