लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे. येथे जाण्यासाठी आर्वी आगाराच्यावतीने बसफेरी होती. मात्र गत दोन वर्षांपूर्वी ही फेरी बंद करण्यात आली. आर्वी बस आगाराला १० नवीन हिरकणी कोऱ्या गाड्या मिळाल्या होत्या त्यातील तरी एक बस माहूरसाठी राखीव ठेवण्यात येईल, असे वाटले होते मात्र अद्यापही बस देण्यात आली नाही. आणखी किती दिवस बसफेरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
साडेतीन शक्ती पिठापैकी एक प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर आहे. देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आर्वी येथून थेट माहूर बसफेरी सुरू होती. मात्र कोरोना काळात ही बसफेरी रद्द करण्यात आली. त्यानंतर मागणी करूनही एसटी महामंडळाने बस सुरू न केल्याने भाविकांचा हिरमोड होत आहेत.
परिणामी अनेक प्रवाशांमध्ये नाराजीचा तीव्र सूर उमटत आहेत. आर्वी लगतच्या आष्टी, तळेगाव, जळगाव, रोहणा, शिरपूर, मांडला, विरूळ, नांदपूर, टाकरखेडा, वर्धमनेरी, खुबगाव, देऊरवाडा, लहादेवी, हिवरा, आष्टी, तळेगाव, चिस्तुर खडकी, कर्माबाद, अहिरवाडा येथून जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. आर्वी-माहुर बस त्वरित सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहेत. ही बसफेरी नवरात्रीपूर्वी सुरू झाली नाही तर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
"माहूर म्हणजे आमच्या कुटुंबाचे श्रद्धास्थान आहे. माहूरला जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे आमच्या खिशाला प्रचंड आर्थिक भुर्दंड पडत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देत बंद असलेली फेरी सुरू करावी."- हर्षल आसकर, आर्वी
"आर्वीच्या बस डेपोमध्ये बसचा तुटवडा असल्यामुळे अद्यापही माहूर बसगाडी सुरू केली नाहीत. यवतमाळ नंतर या गाडीला माहूरकडे जाणारे प्रवाशी सदर गाडीला मिळत नसल्याने नाईलाजास्तव ही गाडी बंद करावी लागली. आगाराला १० नवीन हिरकणी गाड्या उपलब्ध झाल्या. माहूर, शेगाव व रामटेक गाड्या आम्ही पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू."- आशिष मेशराम, आगार प्रबंधक, आर्वी
"आर्वी माहूर गाडीने वर्षातून पाच-सहा वेळा माहूरला दर्शनासाठी नित्यक्रमाने जातो. परंतु आर्वीच्या डेपोने ही गाडी, दोन वर्षापासून अचानक बंद केल्याने माहूरला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यवतमाळवरून सुध्दा माहूरकडे जाणाऱ्या हाऊसफुल्ल असतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. आर्ची-माहूर ही गाडी नवरात्र उत्सवापूर्वी सुरू करावी, बसडेपोला नवीन हिरकणी गाड्या मिळाल्याने धार्मिक स्थळांना भेटीसाठी माहूर, शेगाव, रामटेक या गाड्या आवश्यक आहेत."- अविनाश टाके, नागरिक, आर्वी