लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.गांधी रिसर्च फाऊंडेशन जगळगाव व्दारा जिल्हास्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना बोबडे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भगवान जक्कुलवार आणि समन्वयक डॉ. अजय किनखेडकर उपस्थित होते.महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. संरचनात्मक विधायक कामाकरिता निर्माण होणारी युवा शक्ती विनाशाकडे वळत आहे. आपण पदव्यांची भेंडोळी हातात घेतो त्यामुळे शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. शिक्षकाने आईच्या स्तरावर असले पाहिजे. आपल्या संशोधन व ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, महत्मा गांधी, स्वामी विवेकानंद या सारख्या महापुरुषांचे एक तरी गुण आपल्या अंगी उतरवावा, असा मौलिक सल्लाही भुजंगराव बोबडे यांनी दिला.जगाचा शास्वत विचार साधावयाचा असेल तर गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच तो शक्य आहे. आज अनेक देशामध्ये विविध कोर्सेसव्दारे गांधीजींच्या मूल्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करुन भावी पिढ्यांना संस्कारीत करण्याकरिता या परीक्षेचे आयोजन केले जाते, असे मत प्रा. भगवान जक्कुलवार यांनी मांडले.तसेच कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. अजय किनखेडकर यांनी केले. शुभम उमाटे, गायत्री काकडे आणि सारीका तेलगोटे यांनी परीक्षेबाबत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. बी. बैस यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राजेंद्र वरकल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातून शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.अकरा वर्षात विदेशातही रोवले पायराष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा सुरु केली. प्रारंभी फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच ही परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी ४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता ही परीक्षा आठ राज्यातसोबतच जपान, अमेरिका व फ्रान्स या देशातही घेतली जाते. यावर्षी या परीक्षेकरिता चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, जिल्हाधिकारी व तहसीलदार सहभागी झाले होते.
विज्ञान युगात मानवी मूल्यांचा ऱ्हास होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:36 PM
महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.
ठळक मुद्देभुजंगराव बोबडे : गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण