लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील वर्षीप्रमाणे यंदाही सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेकडो हेक्टरमधील तुरीचे पीक करपणे सुरू झाले आहे. सुरुवातीला तुरीचे पीक चांगलेच बहरलेले असल्याने यावर्षी तुरीचे उत्पादन चांगल्याप्रमाणे होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे चांगले खत व फवारणी केली; परंतु गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर मर राेगाने आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी आपापल्या परीने शेतात तूर पिकाची पेरणी केली होती. अनेकांनी कपाशीच्या पिकातच तुरीची लागवड केल्यानंतर सुरुवातीला दिमाखात असणाऱ्या कपाशीच्या पिकावर बोंडअळी आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या पिकावर अनेकवेळा फवारणी करून बोंडअळी कमी होत नाही, तोच हिरव्यागार असलेल्या तुरीच्या झाडांना शेंगा पकडणे सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेकांच्या शेतातील तुरीचे पीक करपणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेले पैसेही निघणे कठीण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या पिकावर खर्च करून आता आपल्याला तुरीचे पीक चांगले होणार, या आशेत होते; मात्र अनेक परिसरात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून, हाती आलेले पीक उद्ध्वस्त करीत असल्याचे दिसून येत आहे.
वातावरणाचा गव्हावर परिणाम
- गिरड : वातावरणाचा हरभरा व गव्हाच्या पिकावर परिणाम झाला आहे. गत पंधरा दिवसापासून वातावरणात बदल झाला असून ,ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे . बदलत्या वातावरणाचा तूर हरभरा व गव्हावर परिणाम झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर आहे . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने कापूस , सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यानंतर रब्बी हंगाम साथ देईल म्हणत शेतकऱ्यांनी गहू हरभरा ज्वारी पिके घेतली पण सध्या स्थितीत हवामानात बदल झाला आहे . गट पंधरा दिवसांपासून धुई व ढगाळ वातावरण तयार होत आहे . यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर अळ्याचा प्रादुर्भाव झाला आहे . परिसरातील गिरड , मोहगाव , पिपरी , धोंडगाव , पिंपळगाव , ताडगाव , केसलापार भागातील शेतकऱ्यांनी रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहे .
वीजपुरवठा खंडित करणे सुरूच - मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या थकीत बिलापोटी वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे . परिसरातील शेतकरी आधीच रोगराई पडत असल्याने चिंतातुर आहे . अशा परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे . तात्पुरते काही प्रमाणात बिलाचे पैसे घेऊन सूट द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे
सध्या ढगाळ वातावरण असल्याने हाती आलेल्या तुरीच्या पिकावर पाणी फिरणार की काय, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. हजारो रुपये खर्च करून तुरीचे पीक फवारणी व अनेक प्रकारची खते देऊन तयार केली. हिरव्यागार तुरीच्या झाडांना चांगल्याप्रमाणे तुरीच्या शेंगा पकडणे सुरू झाले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.- विशाल बोके, शेतकरी, वाठोडा.