वर्धा : सोशल मीडियावर भेटलेली एखादी अनोळखी तरुणी व्हिडीओ कॉल करून तुम्हाला विवस्त्र होण्यास भाग पाडत असेल, तर जरा भानावर या..! कारण भुरळ घालणारी देखणी तरुणी ही दुसरी, तिसरी कुणी नसून, सायबर चोरट्यांच्या सेक्सटॉर्शन टोळीचीच सदस्य असते.
मागील ११ महिन्यांत तब्बल शंभरावर वर्धेकरांना अशा ललनांनी सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला असून अनेकांनी बदनामीखातर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासही टाळाटाळ केली असल्याचे चित्र आहे. मात्र, घाबरू नका, समोर या, व्यक्त व्हा, आणि पोलिसात तक्रार द्या, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच सायबर सेलकडे सेक्सटॉर्शनच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी सायबर सेलचा आधार घेत या गुन्ह्यांना कसे रोखता येईल, या दिशेने कामही सुरू केले होते. मात्र, तरीही पुढील सहा महिन्यांत या ललनांनी दुप्पट वर्धेकरांना आपल्या जाळ्यात अडकवलेच. ग्रामीण भागासह शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक सेक्सटॉर्शनचे शिकार झाले आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी कित्येकजण तक्रार देण्यासाठी समोर येत नाही. सायबर पोलिसांच्या आवाहनानंतरही तरुणांसह वयस्करही या जाळ्यात अलगद अडकत आहेत. यामुळे ‘ललनांचे सेक्सटॉर्शन जोमात अन् वर्ध्यातील आंबटशौकीन कोमात’ असे म्हटल्यास तर वावगे ठरणार नाही.
सोशल मीडियावरील अनोळखी तरुणी तुम्हाला मैत्रीच्या जाळ्यात खेचून जवळीक निर्माण करीत न्यूड व्हिडीओ कॉल करते. त्यानंतर ती स्वतहा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर विवस्त्र होते. आपल्या मादक अदांनी तुम्हालादेखील विवस्त्र होण्यास भाग पाडते. काही क्षणात तुम्ही देखील तिच्यासमोर विवस्त्र होता. मात्र, त्याचवेळी तुमचा व्हिडीओ समोरील तरुणीकडे रेकॉर्ड होत असतो. व्हिडीओ संपताच काही मिनिटांत तुमचा न्यूड व्हिडीओ तुमच्या मोबाईलवर धडकतो. त्यानंतर हा व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी करतो. त्यामुळे अशा सायबर भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
ललनांच्या मादक अदा पाडतात भुरळ
नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर ठगांनी सेक्सटॉर्शन हा नवीन फंडा सुरू केला आहे. यात फेसबुकवरून सुंदर तरुणी चॅटिंग करून टार्गेट फिक्स करतात. मोबाईल क्रमांक मिळविल्यानंतर स्वत नग्न होऊन व्हिडीओ कॉलवर समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढण्यास भाग पाडतात. नग्न तरुणी पाहिल्यानंतर अनेक आंबटशौकीन मंडळी स्वत:चे कपडे उतरवण्यास तयार होतात. त्यावेळी तरुणी हळूच व्हिडीओ रेकाॅर्ड करून ठेवते. रेकॉर्ड केल्यानंतर सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. तरुणी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागते. बदनामीच्या भीतीने काहीजण पैसे देऊन टाकतात. मात्र, पैशांचा तगादा सतत सुरू राहतो.
एकटे राहणारे अडकतात जाळ्यात
वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले घटस्फोट अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. विशेष करुन शिक्षण, नोकरीसाठी मोठ्या शहरात आलेल्यांचा यात मोठा समावेश आहे. अलीकडे महिलादेखील यात गुरफटल्या जात आहेत.
ही काळजी घ्या...
अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी आपला मोबाईल क्रमांक शेअर करू नका.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीचे व्हिडीओ कॉल स्वीकारू नका.
अनोळखी व्यक्तीकडून आधी व्हॉईस कॉल आला असेल आणि नंतर व्हिडीओ कॉलची रिक्वेस्ट येत असेल, तर ती स्वीकारू नका. अशाप्रकारे कुणी ब्लॅकमेल करीत असेल तर सायबर पोलिसांशी संपर्क करा.
समाजामध्ये अनोळखी व्यक्तीसोबत अतिमोकळे होणे टाळले पाहिजे, समोरच्या व्यक्तीचा परिचय असल्याशिवाय मैत्री करणे धोकादायक ठरू शकते. कुणीही जाळ्यात अडकल्यास किंवा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यास पोलिसांशी संपर्क करून तक्रार करा, नागरिकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहा.
प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा