लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हनुमान टेकडी हिरवीगार करण्यासह जलसंवर्धनाद्वारे भूगर्भातील जलपातळी वाढविण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी महाश्रमदान करण्यात येते. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत शहरातील विविध शिकवणी वर्गाचे शेकडो विद्यार्थी, त्यांचे गुरुजन, सामाजिक संघटना, संस्थाचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले. यावेळी श्रमदानात रोप लागवडीसाठी तीन हजार खड्डे खोदण्यात आले.सकाळ्पासून महाश्रमदानासाठी वर्धेकर, विद्यार्थी, सामाजिक संघटना, संस्थेच्या प्रतिनिधींची पावले हनुमान टेकडीकडे वळली. व्हीजेएमच्या वतीने या महाश्रमदानाची पूर्वतयारी करताना खड्डे खणण्याकरिता जागा आखून ठेवण्यात आल्या होत्या. ६०० वर्धेकर फावडे, टिकास घेऊन सज्ज झाले असता योजनाबद्धरित्या श्रमदानाला सुरुवात करण्यात आली.या श्रमदानात नगराध्यक्ष अतुल तराळे, विद्यासागर कोचिंग क्लासेसचे संचालक सुरेंद्र नगराळे, शिक्षक खुशबू दुर्गे, गणेश मोहकर, रुचिरा बंडोपिया, कांचन कुलकर्णी, गणेश दुर्गे आणि २७० विद्यार्थी, प्राइम डायमण्ड अॅकेडमीचे संचालक विशाल उराडे व १४० विद्यार्थी, संस्कार कोचिंग क्लासेसचे संचालक मिलिंद कडू व ११० विद्यार्थी, न्यूटन फिजिक्स अॅकेडमीचे संचालक पिसे व ५० विद्यार्थी यांचे वेगवेगळे समूह कार्यरत होते. यासह आपले सरकार, बहार नेचर फाउंडेशन, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, व्हीजेएम, जनहित मंच, शिवगर्जना ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी श्रमदानात वाटा उचलला. शिवगर्जना ढोल ताशा पथकाचे संचालक गणेश ढवळे यांनी श्रमदात्यांकरिता शीतल पेयाची व्यवस्था केली होती. तर डॉ. राजेश सरोदे, दिनेश रुद्रकार, निलेश मोहदुरे, सुभाष पाटणकर, डॉ. सचिन पावडे यांनी फराळाची व्यवस्था केली. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू असा निर्धार व्यक्त करीत श्रमदानाचा हनुमान टेकडीवरील दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.
श्रमकर्त्या शेकडो विद्यार्थ्यांनी व्यापली टेकडी
By admin | Published: June 19, 2017 1:11 AM