देऊरवाडा / आर्वी : वर्षभरापूर्वीच वैवाहिक जीवन सुरू झालेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे आर्वीच्या नेताजी वॉर्ड भागात एकच खळबळ उडाली असता त्या विवाहितेने पती व सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तसेच ती हुंडाबळी ठरल्याचे आर्वी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील मृत महिलेच्या आरोपी पतीसह सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अश्विनी सुमित फसाटे हिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेतल्याने नेताजी वॉर्डात एकच खळबळ उडाली होती. मृत अश्विनी हिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यावर रात्री उशिरा या विवाहितेचा पती सुमित उर्फ पियुष फसाटे (३०) व सुमितचे वडील ज्ञानेश्वर फसाटे (६०) यांना अटक केली. घटनेनंतर आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात अश्विनीच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी फौजदार योगेश चाहेर, रंजीत जाधव, अमोल बरडे, अनिल वैद्य, सतीश नंदागवळी, प्रदीप दाताळकर, राहुल देशमुख यांनी गोपनीय पद्धतीने माहिती जाणून घेतली. याच गोपनीय तपासादरम्यान अश्विनी हिला पती व सासऱ्याकडून हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना गुरूवारी आर्वी पोलिसांनी अटक केली.
अश्विनी होती गर्भवती
मृत अश्विनी हिचा विवाह एक वर्षांपूर्वी झाला होता. शिवाय ती गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. पती पियुष खामगाव येथे खासगी कंपनीत नोकरीत आहे. घटनेच्या दिवशी सासरे वर्धा येथे गेले होते. आराम करते, असे सासूला सांगून अश्विनी तिच्या खोलीत गेली. बराच वेळ होऊनही ती खोलीबाहेर न आल्याने पाहणी केली असता तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
अश्विनी सुमित फसाटे हिने हुंड्यासाठी पती व सासऱ्याकडून दिल्या जात असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यानंतर या प्रकरणातील मृतक महिलेचा आराेपी पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
- योगेश चाहेर, तपास अधिकारी, पो. स्टे. आर्वी.