रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. उन्हात फिरताना थंड शरबत किंवा ऊसाचा रस मिळाल्यास उत्तम असे म्हणून त्याचे सेवन करण्यास प्राधान्य दिले जाते. आरोग्याकरिता लाभदायक असलेल्या या पेयात वर्धेत टाकण्यात येत असलेला बर्फ मात्र आरोग्याकरिता अपायकारक ठरणाराच असल्याची शंका व्यक्त होत आहे. वर्धेतील एकाही कारखानदाराला खाण्याकरिता बर्फ निर्माण करण्याचा परवाना नाही. यामुळे वर्धेत ‘चिल्ड’ शरबत अन् ऊसाच्या रसात वापरल्या जात असलेला बर्फ अप्रमाणित असून तो औद्योगिक वापरातील आहे.वर्धा शहरात चार बर्फ कारखाने आहेत. या चारही कारखानदारांना बर्फ निर्माण करून तो खाण्याकरिता देण्याची परवानगी नाही. वर्धेतील या कारखानदारांना केवळ औद्योगिक वापराकरिता बर्फ निर्मितीची परवानगी आहे. मग वर्धेतील हातबंड्या आणि काही दुकानात विकल्या जात असलेल्या शरबतात वापरला जाणारा बर्फ कुठला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा बर्फ जर वर्धेतील कारखानदारांकडून औद्योगिक वापराकरिता निर्माण करण्यात येत असेल तर त्यात वापरण्यात येत असलेल्या पाण्याबद्दल शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे नागरिकांच्या खाण्यात अशुद्ध पाण्याचा बर्फ जावून त्यांच्या आरोग्यास अपाय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात येथील अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आमच्याकडे खाण्याकरिता बर्फच निर्माण होत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना आल्या पावली परत यावे लागते.वर्धेत खाद्याकरिता बर्फ निर्मिती होत नसताना वर्धेतील हातगाड्यांवर बर्फाच्या मोठ मोठ्या लाद्या दिसतात. येथे खाण्याकरिता बर्फ निर्मितीला परवानगी नसताना हा बर्फ कुठून आला असा प्रश्न निर्माण होत आहे. ऊसाचा रस, लिंबू शरबत यासह काही ठिकाणी बर्फाचे शरबत विकल्या जात आहे. त्यांच्याकडून बर्फाच्या लाद्यांचा चूरा शरबतात टाकल्या जातो. या अप्रमाणित बर्फातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्रास होत असलेल्या या अवैध बर्फाच्या व्यवसायावर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध लावण्याची गरज वर्धेत निर्माण झाली आहे.वर्धेत बर्फ निर्मितीचे चार कारखाने आहेत. या पैकी एकाही कारखान्याला खाण्याकरिता बर्फ विकण्याची परवानगी नाही. त्यांना केवळ औद्योगिक वापराकरिता बर्फ निर्माण करण्याची परवानगी आहे. यामुळे वर्धेतील बर्फ खाण्याकरिता योग्य नाही. अन्न व औषधी प्रशासन मंत्र्यांनी औद्योगिक वापराकरिता असलेला बर्फ निळसर रंगात निर्माण करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अशा अवैध बर्फ विक्री व वापरावर प्रतिबंध लावता येईल.- रविराज धाबर्डे, अन्न व औषधी प्रशासन विभाग, वर्धा.खाण्यास अयोग्य बर्फ निळ्या रंगातवर्धेप्रमाणे अनेक शहरात केवळ औद्योगिक वापराकरिता बर्फ निर्मिती करण्याचा परवाना आहे. मात्र या कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात बर्फ निर्माण करून तो खाद्याकरिता विकल्या जात आहे. यातून नागरिकांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी औद्योगिक वापराचा बर्फ निळसर रंगात निर्माण करण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेवर सध्या अंमल झालेला नाही. यामुळे अजुनही बाजारात खाण्याकरिता आणि औद्योगिक वापराकरिता असलेला बर्फ पांढऱ्याच रंगात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा निर्णय लवकरच अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.रंग बदलताच कारवाई शक्यउन्हाळ्याच्या दिवसात थंड बर्फाचा बाजार गरम होतो. यात परवानगी नसलेल्यांकडूनही बाजारात नागरिकांना खाण्याकरिता बर्फ विकल्या जातो. या माहितीवरून अन्न व औषधी प्रशासनाकडून कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला असता कारखानदाराकडून आमच्याकडे खाण्याकरिता बर्फ निर्माणच होत नसल्याचे सांगण्यात येते. बर्फाच्या रंगात बदल झाल्यास तो खाण्यात वापरताना दिसल्यास त्या विक्रेत्याच्या माध्यमातून कारखानदरावर कारवाई करणे अन्न व औषधी विभागाला सोपे जाईल.
खाद्य परवान्याविनाच बर्फाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:51 PM