वरिष्ठांचे दुर्लक्ष :कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास वर्धा : शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी प्रत्येक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात; पण वर्धेच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज आहे. जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा शहरात विविध कामानिमित्त जिल्ह्यातील गावखेड्यातील नागरिक येतात. शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. परिणामी, विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना चिखल तुडवतच या कार्यालयात जावे लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या शेजारी तहसील कार्यालयाची नविन इमारत तयार केली जात आहे. याच बांधकामाचे पाणी परिसरात नाली नसल्याने सध्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात साचत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले असून त्यात डासांचीही निर्मिती होत आहे. परिणामी, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मेटाकुटीस आले आहे. याकडे संबंधीत अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
भूमी अभिलेख कार्यालयाला चिखलाचा विळखा
By admin | Published: December 25, 2016 2:22 AM