लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना ओळखून, रोखण्यासाठी आता सर्वांनीच हस्तक्षेप कारायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहासकार व हिंद स्वराज्य शताब्दी, महाराष्ट्रचे संयोजक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर यांनी व्यक्त केली.येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात समाजविज्ञान अभ्यास मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष व कस्तुरबा गांधी स्मृतिदिनानिमित्त ‘महात्मा गांधी : समज गैरसमज’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य रंभा सोनाये, डॉ.प्रियराज महेशकर, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, डॉ. सुधाकर सोनोने, प्रा. दत्तानंद इंगोले उपस्थित होते. डॉ. रोडे म्हणाले, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे भांडवल करणारे लोक ते पैसे देण्याच्या करारावर पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वाक्षरी का केली होती आणि पाकिस्तानचा मुद्दा नसण्यापूर्वीच गांधींची हत्या करण्याचे पाच प्रयत्न का झाले होते, या प्रश्नावर मात्र गप्प राहतात. सुभाषचंद्र बोस असोत नाही तर आंबेडकर, त्यांच्यासोबत गांधींचे वैचारिक मतभेद होते, पण मनभेद नव्हते. म्हणूनच बोसांनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ हे अजरामर संबोधन दिले. तर गांधींनी आग्रहपूर्वक आंबेडकरांचा समावेश स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात करून घेतला. एक कृती, ही हजार शब्दांहून अधिक बोलकी असल्याचे गांधींजी मानत असत. त्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीत समसमानता होती. म्हणूनच त्यांचा हा आदर्श घेत आता आपण सर्वांनीच बोलके सुधारक न होता कृतिशील कार्यकर्ते व्हायला हवे, असेही ते म्हणाले. गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाºया प्रवृत्तीचा निषेध करीत डॉ.सोनाये यांनी समारोप केला. प्रास्ताविक डॉ. महेशकर तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनोने यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ.अनिता देशमुख, डॉ.मालिनी वडतकर, डॉ. सोनाली शिरभाते, प्रा. अमोल घुमडे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, नरेश आगलावे, राजू मुंजेवार यांनी सहकार्य केले. पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
महात्मा गांधींबाबत भ्रम पसरविणाऱ्यांना ओळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:18 PM
महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील व्याख्यानात सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन