लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ऐन रब्बी हंगामाच्या तोंंडावर नागपूर- नांदेड रेल्वे मार्गाकरिता सालोड (हिरापूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. त्यामुळे या परिसरातील तब्बल सात हजार हेक्टरवरील सिंचन अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत खोदकाम केलेल्या खड्ड्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावर लवकर तोडगा काढला नाही आणि थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली तर येथील जेसीबी पेटवून हात शेकवू, असा संताप व्यक्त करून प्रशासनाला इशारा दिला आहे.शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता रबी हंगामावर त्यांची आशा असताना ऐन रबी हंगामाची लगबग सुरू होताच सालोड परिसरातील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. याच कालव्याच्या पाण्यावर परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या सात हजार हेक्टरमधील पिकांना सिंचनाची सोय होत होती. त्यामुळे आता या सर्व शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागणार असल्याने चणा व गहू पिकेही घेता येणार नाही.यासोबतच जनावरांच्या वैरणाचाही मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय व जिल्हा प्रशासनाने रेल्वे विभागाला खोदकाम करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती निवेदनातून केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने रेल्वे विभागाला परवानगी दिल्याने हा उपकालवा फोडण्यात आला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आता रब्बी हंगामापासून वंचित राहणार असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीकरिता खोदकाम केलेल्या खड्ड्यात बसून मंंगळवारी सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते; पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या आंदोलनाची प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही आणि येथेच थंडीमध्ये रात्र काढावी लागली तर तीव्र आंदोलन करू, वेळेप्रसंगी महामार्गावर मुला- बाळांसह रास्ता रोको करू, असा इशाराही दिला. त्यामुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली असून ते या आंदोलनाकडे लक्ष देऊन आहे.
तिरंगा ध्वज घेऊन शेतकऱ्यांचा एल्गार- प्रशासनाला पूर्वीच विनंती केल्यानंतरही शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता येथे रेल्वेच्या कामाकरिता चक्क उपकालवा फोडून दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना संकटात लोटले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून किसना देवतळे या शेतकऱ्यांच्या नेतृत्वात हाती तिरंगा ध्वज घेऊन आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची माहिती मिळताच खासदार रामदास तडस, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत, सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंखे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.
निम्न वर्धा प्रकल्पाचे अधिकारी निगरगट्ट- शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा करून त्यांच्या उत्पादन वाढीस भर घालण्याची जबाबदारी निम्न वर्धा प्रकल्प अधिकारी कार्यालयाची आहे; परंतु, या कार्यालयाने ऐन सिंचनाच्या हंगामातच रेल्वेला उपकालवा फोडण्याची परवानगी देऊन शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवले. इतकेच नाही तर आज आंदोलनस्थळी खासदार रामदास तडस यांनी भेट देऊन निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कार्यकारी अभियंता किंवा शाखा अभियंताऐवजी कनिष्ठ अभियंत्याला या ठिकाणी पाठविले. त्यामुळे हा विभाग शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती निगरगट्ट असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
मदत काय देणार, याचे लेखी आश्वासन द्या!- अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे आधीच तोंडचा घास हिरावला आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळाली असून ही मदत केवळ तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे. रब्बीवर आशा होती; पण तीही प्रशासनाने आमच्याकडून हिरावून घेतली आहे. त्यामुळे गहू व चण्याचे पीक घेता येणार नसल्याने प्रशासन शेतकऱ्यांना हेक्टरी काय मदत देणार. यासोबतच जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात काय तोडगा काढणार, हे लेखी स्वरूपात द्यावे. तेव्हाच आंदोलन मागे घेऊ, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.