फलक कायमच : अप्रत्यक्षरित्या होतोय प्रचार वर्धा : कुठल्याही निवडणुका असल्या की निवडणूक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. यात कडक नियम लादले असून कारवाईची तरतूदही करून देण्यात आली आहे; पण प्रशासनच या आचार संहितेच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक करीत असेल तर दोष कुणाला द्यावा, हा प्रश्नच आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष वा संभाव्य उमेदवारांच्या कामांचे फलक झाकणे गरजेचे असते; पण जि.प., पं.स. निवडणूक तोंडावर असतानाही अनेक ठिकाणी राजकारण्यांचे फलक अप्रत्यक्षरित्या त्यांचा प्रचार करीत असल्याचेच दिसते. १६ फेबु्रवारी रोजी जि.प. व पं.स. साठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. हा कार्यक्रम लागू होताच निवडणूक विभाग, संबंधित स्वराज्य संस्थांना सर्वप्रथम कुणाचाही प्रचार होईल, असे फलक झाकावे लागतात. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ही कामे चोखपणे होत होती; पण अता प्रशासनच उदासिन तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत फलक प्रचार करीत असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील फलकांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच सदर फलक निवडणूक विभागाकडून झाकले गेले; पण जिल्ह्यात आणखी कुठे राजकारण्यांचे फलक आहेत काय, हे तपासले गेले नाही. मंगळवारीही वायगाव (नि.) येथे विकास कामांबाबतचे फलक कायम होते. विशेष म्हणजे या फलकावर जानेवारी २०१७ असे नमूद केले असून दिनांक दिलेला नाही. या फलकावर विद्यमान खासदार, माजी खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार यांची नावे आहेत. वास्तविक, राजकीय पक्षांची विविध कामे, शासनाची कामे, नेत्यांचे फलक झाकणे गरजेचे आहे. आचार संहिता लागू होताच निवडणूक विभागाला ही कामे करावी लागतात. यंदा सार्वत्रिक निवडणूक विभागाची जबाबदारी लोनकर यांच्याकडे आहे. त्यांच्या यंत्रणेकडून ही कामे झाली नसल्याचे दिसून येते. यामुळे निवडणूक विभागच आचार संहितेच्या कठोर अंमलबजावणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
आचारसंहिता अंमलबजावणीकडे प्रशासनाचीच डोळेझाक
By admin | Published: February 01, 2017 1:23 AM