हर्षल तोटे ल्ल पवनारसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक होणे गरजेचे आहे; पण याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते. गणेशोत्सवाचे पाच दिवस लोटले असताना प्रशासनाकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. यावर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला बगल दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून दाखल जनहित याचिकेवर निर्णय देताना मूर्ती, निर्माल्य, काडी-कचरा नदीपात्रात जाऊ न देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली. मागील वर्षी पवनार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व सेवाग्राम पोलीस ठाण्याने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न केला; पण विसर्जनास येणाऱ्या मूर्तींची संख्या अधिक असल्याने पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास यंत्रणा अपूरी पडली. स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य नदी पात्रात टाकण्यास मज्जाव केल्याने सुमारे १७ ट्रॅक्टर ट्राली निर्माल्य पात्राबाहेर जमा करण्यात आले. यानंतर निर्मात्याची विल्हेवाट लावण्यासाठी बराच खर्च करावा लागला.दरवर्षी विसर्जनाच्या तात्पुरत्या व्यवस्थेला लागणारा खर्च ग्रा.पं. प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून विसर्जन कुंडाच्या निर्मितीचा प्रस्ताव ग्रा.पं. ने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शेऱ्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा सात-बारा उताराही दिला होतो. सदर कुंडाच्या निर्मितीकरिता अंदाजे ७० लाख रुपये लागणार आहे. या निधीची तरतूद कशी करायची, या विवंचनेत कुंडाचा प्रस्ताव रखडल्याने यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन होणार नसल्याचेच दिसते.धाम नदी तिरावर दरवर्षी साधारणत: लहान-मोठ्या आठ हजार मूर्तींचे विसर्जन होते. दरवर्षी सर्व मूर्ती नदी पात्रात विसर्जित केल्या जातात. बऱ्याच मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरीसच्या असल्याने त्या विरघळत नाही. काही दिवसांनी त्यांचे अवशेष शिल्लक राहतात. सोबतच नदीपात्र दूषित होऊन परिसरात कचरा साचून दुर्गंधी पसरते. आश्रम परिसर व धाम नदीच्या सौदर्यांची पर्यटकांना नेहमी भुरळ पडते. यामुळे दररोज येथे अनेक पर्यटक येतात; पण गणपती व नवरात्र उत्सवानंतर परिसरात फिरणे अवघड होते. याबाबत पवनार ग्रा.पं. ने प्रशासनाला अनेकदा गळ घातली; पण त्याचा उपयोग झाला नाही. खर्चाची बाब आवाक्याबाहेर असल्यानेही यंदा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी ग्रा.पं. ने हात वर केले तर जि.प. ला पर्यायी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.यावर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन होईल, अशी चिन्हे दिसत नाही. यावर पर्यावरण व निसर्गप्रेमी काय भूमिका घेतात, हे पाहणे औचित्याचे राहणार आहे.पोलीस प्रशासनाने चालविली विसर्जनाची तयारी४कुठलीही जीवित हानी न होता विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस प्रशासनाने आपली तयारी केली आहे. दोन्ही तिरांवरील विसर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. गणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ट्रॉलीवरून गणपती नदी पात्रात विसर्जित होईल. पवनार येथील पट्टीचे पोहणारे स्वयंसेवक म्हणून नियुक्त केले असून त्यांना विविध रंगाचे लाईफ गार्डस दिले जाणार आहेत. सेवाग्राम परिसरातील सर्व पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाच्या चमूही तैनात करण्यात येणार आहे. ४अनुचित प्रकार टाळण्यासाठी १०० स्वयंसेवकासह १०० हवालदार व सहा अधिकारी सज्ज राहणार आहेत. विसर्जनादरम्यान लहान पुलावरून येण्याचा मार्ग व मोठ्या पुलावरून परतीचा मार्ग, अशी एकेरी वाहतूक राहणार आहे. विसर्जनासाठी आश्रम परिसरात मूर्तीचा रथ सोडून इतर वाहनांना मज्जाव करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. भाविकांनी विसर्जनाच्या वेळी खोल पाण्यात जाऊ नये. विसर्जनाकरिता मूर्ती स्वयंसेवकाच्या हाती द्यावी. निर्माल्य नदी पात्रात टाकू नये, असे आवाहनही सेवाग्राम पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरीक्षकांनी केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सेवाग्राम पोलीस दक्ष आहे. वॉच टॉवर, स्लायडींग ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीची योजना आखण्यात आली आहे. निर्माल्य नदीत पात्रात जाऊ न देण्यासाठी निर्माल्य कुंडही तयार करण्यात येणार आहे. परिसरातील संपूर्ण पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाचीही मदत या कार्यासाठी घेण्यात येणार आहे. - पराग पोटे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, सेवाग्राम.गतवर्षी जि.प. प्रशासनाने सर्व जबाबदारी पवनार ग्रामपंचायतीवर टाकली होती. विसर्जनाच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कुंड्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता; पण यावर्षी तो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. ग्रामपंचायतीची सामान्य फंडातील आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे जिल्हा परिषदेने निधीची व्यवस्था केल्यास पर्यावरणपूरक मूर्ती विर्सजनाची व्यवस्था करता येईल.- अजय गांडोळेसरपंच, ग्रा.पं. पवनार.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे दुर्लक्ष
By admin | Published: September 22, 2015 3:20 AM