वर्धा : येथील महात्मा गांधी पुतळा ते इंदिरा गांधी उड्डाणपूलपर्यंतच्या रस्त्याची नुकतीच दुरूस्ती करण्यात आल्याने हा मार्ग सध्या गुळगुळीत झाला आहे. परंतु, सदर रस्त्याच्या दुरूस्तीदरम्यान मार्गावरील तुटलेल्या रस्ता दुभाजकाची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सेवाग्राम मार्गावरील रस्ता दुभाजकाच्या दुरूस्तीसाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे. शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावरील महात्मा गांधी पुतळा ते इंदिरा गांधी उड्डाणपूल दरम्याच्या रस्ता दुरूस्तीचे काम यंदाच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात आले. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक मेटाकुटीस आले होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारामार्फत रस्ता दुरूस्तीचे काम करण्यात आल्याने नागरिकांची खड्डेमय रस्त्याच्या जाचातून सुटका झाली आहे. रस्तादुरूस्तीचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी होत असलेल्या कामाची पाहणी केली. त्यामुळे याच मार्गावरील ठिकठिकाणी तुटलेल्या रस्ता दुभाजकाचीही दुरूस्ती होणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झाले नाही. तुटलेला रस्ता दुभाजक एखाद्या अनुचित प्रकाराला आमंत्रण देत आहे. परिमाणी, रस्तादुभाजकाची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी) ‘त्या’ विद्युत खांबामुळे अपघाताची भीती वर्धा-सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम परिसरात रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीच्या मालकीचा विद्युत खांब बेवारस्थितीत पडून आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना सदर विद्युत खांब सहन दिसत नसल्याने अपघाताची भीती बळावत आहे. बऱ्याच दिवसांपासून महावितरणच्या मालकीचा हा विद्युत खांब सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम परिसरातील २९८००३ /२०२/पी./११६ या विद्युत खांबाजवळ पडून असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांना चोरीची आयतीच संधीच मिळत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
दुभाजकाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
By admin | Published: April 19, 2017 12:43 AM