गुन्हे शाखेची कारवाई : सहा दिवसांची पोलीस कोठडी वर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अवैध बांधकाम प्रकरणी प्रमोद मुरारका यांनी तक्रार केली होती. यातील सावंगी (मेघे), सिंदी (मेघे) व बोरगाव (मेघे) ग्रा.पं.चे तत्कालीन ग्रामसेवक हरिदास विठोबा रामटेके (४३) रा. विक्रमशिलानगर वर्धा यांना मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी मिळाली. अटक झालेले हे पाचवे ग्रामसेवक होय. सावंगी ग्रा.पं. मध्ये मागील तारखेमध्ये परवानग्या देऊन शासनाचा महसूल बुडविला. याबाबत सावंगी पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी हरिदास रामटेके यांना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सदर आरोपी पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. सावंगी (मेघे) ग्रा.पं. चे तत्कालीन सरपंच उमेश गोपाळ जिंदे, बोरगाव (मेघे) चे तत्कालीन ग्रामसेवक विलास हरिराम रंगारी व सावंगी (मेघे) ग्रा.पं. चे तत्कालीन ग्रामसेवक संजय चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली. प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, गिरीष कोरडे, संजय ठोंबरे, किशोर पाटील, रवी रामटेके, गजानन महाकाळकर, आशिष महेशगौरी व विलास लोहकरे करीत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
अवैध बांधकाम; पाचवा ग्रामसेवक अटकेत
By admin | Published: August 18, 2016 12:42 AM