महसूल प्रशासनाची डोळेझाक : शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना; पोलीस यंत्रणाही मूग गिळून सुधीर खडसे समुद्रपूर तालुक्यातील वणा नदीवर खुणीघाटासह मेणखात व सावंगी (देर्डा) येथील रेतीघाट शासनाने लिलाव केले. या घाटाचा कंत्राट घेताना शासकीय निविदेत असलेले नियम व शर्तीला बगल देत अवैधरितीने या घाटावर पोकलँडद्वारा व नावेचा उपयोग करून रेती उपसा करण्यात येत आहे. या नदीपात्रातून २० फुट खोल खड्डे करून रेती उपसा सुरू आहे. याकडे मात्र महसूलसह पोलीस विभागाकडून डोळेझाक होत आहे. या घाटावरून दिवसरात्र २०० ते ३०० ब्रास रेतीचा उपसा होत आहे. या मार्गाने दररोज १०० ते १५० टिप्पर चालत आहे. एका टिप्परमध्ये ४०० फुट रेतीचह वाहतूक होत आहे. एवढी रेती घेवून हे टिप्पर मांडगाव येथील रस्त्यांवरून सतत धावत आहेत. नदीच्या पात्रामध्ये नाव घालून २० फुट खोलीपर्यंत रेतीचा उपसा सुरू आहे. नदीच्या पात्रात मोठमोठे डोह तयार झाले आहे. गुरे-ढोरे व गावातील लहान मुले खोल पाण्यात गेल्यास जीवहानीची भीती वाढली. या रेतीघाटाच्या व्यवसायात रेतीचा उपसा होवून पैसा मुरत असल्याची चर्चा आहे. गत वर्षी सावंगी (देर्डा) येथील तत्कालीन तहसीलदार सचिन यादव यांनी दोन नावांसह पोकलँड जप्त केले होते. यावेळी सदर व्यावसायिकाला ६ लाखांचा दंड आणि १० वर्षे रेतीघाट व्यवसायात येण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या उपसा होत असलेला रेतीघाट मांडगाव येथून दोन कि़मी. अंतरावर असून येथे पटवारी व मंडळ अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. असे असताना त्यांनी या रेतीघाटावर येत भेट देत पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. हा गोरखधंदा गत नऊ महिन्यापासून सुरू आहे. यावर प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे. रेतीच्या उपस्यात मुरतोय पैसा जिल्ह्यात रेती घाटाच्या व्यवसायात लिलावापासूनच आर्थिक व्यवहार होत असल्याची ओरड होत आहे. याच व्यवहारापोटी वर्धेत नियम डावलून रेतीचा उपसा होत आहे. वर्धेतच नव्हे तर राज्यात या व्यवसायातून काही निष्ठावाण अधिकारी सोडले तर अनेक गलेलठ्ठ झाले आहेत. यामुळे या रेतीच्या उपस्यात मोठ्या प्रमाणात पैसा मुरत असल्याची सर्वसामान्यांकडून ओरड होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
खुणी घाटावर पोकलँडद्वारे रेतीचे अवैध उत्खनन
By admin | Published: February 08, 2017 12:41 AM