वर्धा : वर्धा नदीपात्रातील टेकोडा वाळूघाटातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी ट्रॅक्टरसह आठ लाख ५८ हजारांचा वाळूसाठा जप्त करून तळेगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ११ रोजी गुरुवारी केली.
धनराज बाबूराव शेंडे (३४, रा. टेकोडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर राजेंद्र नारायण चौधरी (रा. भारसवाडा) असे गुन्हा दाखल केलेल्या ट्रॅक्टरमालकाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील वाळू घाटातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करून वाळूची वाहतूक होत असून दुप्पट ते तिप्पट किमतीने विक्री करीत शासनाचा महसूल बुडवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ११ रोजी तळेगाव श्या. पंत हद्दीतील वर्धा नदीपात्रातील टेकोडा घाटावर छापा मारला असता आरोपी ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसले. पोलिसांनी चालकास अटक करून एमएच ३२ एएस ४४८९ क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्राॅली असा आठ लाख ५८ हजारांचा वाळूसाठा जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.