पर्यावरणाला धोका : खाजगी कंत्राटदारांची अरेरावी, प्रशासनाचे दुर्लक्ष झडशी : शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे. सध्या येळाकेळी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. झडशी येथून जाणाऱ्या येळाकेळी ते वर्धा मार्गावर क्षीरसमुद्र व अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करणारी टोळी सक्रीय आहे. या टोळक्याद्वारे दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यात बहुतांश बाभूळीची झाडे कापली जात असल्याचे समोर आले आहे. या टोळक्याला अभय कुणाचे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. यापूर्वी झडशी बीटमधे येणाऱ्या वन विभागाच्या जागेतील बाभळीच्या झाडांची कत्तल कण्यात आली होती. शिवाय अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचीहीदेखील कत्तल केली जात आहे. आता क्षीरसमुद्र येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे कापण्याचा सपाटा कंत्राटदारांनी लावला आहे. अवैधरित्या होणाऱ्या या वृक्षकत्तलीकडे बांधकाम विभाग, वन विभाग तथा सामाजिक वनिकरणचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आमच्याकडे येत नसल्याचे सांगितले जाते. क्षेत्र सहायक कावळे यांना विचारणा केली असता वृक्ष कुणाच्याही हद्दीत असो, ते वाचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. अवैध वृत्ततोड थांबविली पाहिजे, आम्ही चौकशी करू, असे सांगितले. अवैरित्या वृक्षांची कत्तल करणारी ही टोळी सबंध जिल्हाभर वृक्षतोड करीत असून यातून मलिदा मिळवित असल्याचे दिसते. प्रशासनाने याकडे लक्ष देत वृक्षतोड्यांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)झाडे जाळण्याच्या प्रकारातही वाढजिल्ह्यातील अनेक मार्गांवर झाडे जाळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. उन्हाळ्यात या झाडांना आगी लावण्याचे प्रकार वाढीस लागतात. आग लावल्यानंतर दोन-तीन दिवसांत ते झाड जमिनीवर कोसळते. यानंतर त्या झाडाची रात्रीतूनच विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी दिवसा वृक्षांची कत्तल केली जाते तर कुठे झाडांना आगी लावल्या जातात. या प्रकारांमुळे वृक्षांची संख्या घटत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यालगतच्या बाभळाची अवैधरित्या कत्तल
By admin | Published: April 04, 2017 1:22 AM