लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळूचोरीसाठी वाहतूक करीत असताना ट्रॉली पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना अडेगाव येथे सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. अनिल सुरेश लाकडे (३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) दोघेही रा. इंदिरानगर देवळी, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले तर ट्रॅक्टर चालक शंकर मनोहर भानारकर, सागर विजय पारिसे, शिवराम डोंगरे, सचिन नांदूरकर व गजानन भानाकर सर्व रा. इंदिरानगर हे गंभीर जखमी आहे. सोनेगाव (बाई) येथील वाळू घाट आणि नाल्यातून गेल्या काही दिवसांपासून देवळीतील एका दारूविक्रेत्यासह नगरसेवकांने अवैधरित्या वाळू उपसा चालविला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. पण, याची दखल महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने घेतली नसल्याने वाळूचोरी सुरूच राहिली. परिणामी दोन कुटूंब आज उघड्यावर आले आहे. हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झाली. ट्रॉलीत दबून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या सर्व मजुरांनी सोनेगावातील नाल्यावरुन रात्रभर ट्रीप मारल्याचे गावकरी सांगतात. या प्रकरणी देवळी पोलिसांनी नोंद घेतली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
अखेर पापाचा घडा फुटला?- अपघातग्रस्त एम.एच. ३२ ए. एच. ८७०९ क्रमांकाचा ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचा आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती घेतली असता तो गौतम श्यामराव पोपटकर रा. आंबेडकरनगर देवळी यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. देवळी पोलिसांनीही या नावाला दुजाेरा दिला. गौतम पोपटकर हे माजी नगराध्यक्षासह विद्यमान नगरसेवक आहे. ते गेल्या दीड वर्षांपासून सोनेगावातून अवैधरीत्या वाळूचोरी करीत असल्याचे नागरिक सांगत आहे. अखेर या चोरीच्या पापाचा घडा फुटला अन् पैशाच्या हव्यासात दोन मजुरांना जीव गमवावा लागला. आता यासंदर्भात पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? - या अवैध वाळू चोरीमुळेच हा अपघात झाला असून यात दोघांना जीव गमवावा लागला तर पाच मजुर जखमी झाले आहे. याप्रकरणी देवळी पोलिसांनी वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांचा मृत्यू कारणीभूत ठरल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. यात वृत्तलिहित्सोवर ट्रॅक्टर मालकाविरुद्ध कोणतीच कार्यवाही केली नसल्याने प्रकरण दडपण्याचा तर प्रकार होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रॅक्टर चालक व सर्व मजूर हे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष असलेल्या ट्रॅक्टर मालकाकडे काम करीत होते. हा ट्रॅक्टर वाळूचोरीसाठी वापरला जात होता. त्यामुळे या प्रकरणात मालकही दोषी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असल्याचे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.