लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी राळेगाव मार्गावरील पाथरी चौरस्ता येथे संशयावरून एका ट्रकची झडती घेतली. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यावरून पोलिसांनी कारवाई करीत ट्रकमधील १६ जनावरांची सुटका केली. या प्रकरणी ट्रक चालक राजेश ज्ञानेश्वर टेकाम (२६) रा. हलबीपुरा, कळंब जि. यवतमाळ याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली असून अल्लीपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची चमू रात्र गस्तीवर असताना शिपाई निलेश वाघमारे याने पाथरी चौरस्त्यावर जनावरांचा ट्रक पकडल्याची माहिती दिली. या माहितीवरून कारवाई करीत एमएच २९-९६१७ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता यात गोवंशाची जनावरे आढळून आली. या प्रकरणी चालक राजेश टेकाम याला ट्रकमधील जनावरांबाबत विचारणा केली असता त्याने ही जनावरे इरफान कुरेशी नामक व्यक्तीची असल्याची कबुली दिली. ट्रक मालक फरहान व त्याचा भाऊ असलम दोन्ही रा. यवतमाळ यांच्या सांगण्यावरून जनावरे नेत असल्याचे त्याने कबुल केले. ट्रकमध्ये असलेल्या या जनावरांची किंमत १ लाख ६० हजार रुपये व ट्रकची किंमत १० लाख रुपये असा एकूण ११ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमध्ये आढळलेली सर्वच जनावरे वर्धेतील सर्वोदय गोशाळा चॅरीटेबल ट्रस्ट, पडेगाव यांच्या स्वाधीन करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची करवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
जनावरांची अवैध वाहतूक; ट्रक जप्त
By admin | Published: July 07, 2017 1:39 AM