जीवघेण्या कसरतीकडे दुर्लक्ष : बसफेऱ्यांचा अभावही कारणीभूतवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि रेल्वेचे जाळे जिल्ह्याची जमेची बाजू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक कमी होताना दिसत नाही. प्रत्येक मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे पाहावयास मिळते. प्रवासी कोंबून होणारी ही वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यात बहुतांश मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. ही वाहतूक काळी-पिवळी, ट्रॅक्स, मिनी ट्रॅव्हल्स, आॅटोच्या माध्यमातून होत असल्याचे दिसते. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून नियमांचे उल्लंघन केले जाते. शिवाय प्रवाशांना उद्धट वागणूक देत त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात असल्याचे अनेक मार्गांवर पाहावयास मिळते. या अवैध वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कारंजा (घा.), आष्टी व राळेगावकडे सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूकबसफेऱ्यांच्या अभाव असल्यास अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ होत असल्याचे सर्वश्रूत आहे. परिणामी, कारंजा (घा.), आष्टी (शहीद) आणि कानगाव, राळेगावकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून येते. शिवाय देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट, मांडगाव, समुद्रपूर तसेच सेलू या राज्यमार्गांसह ग्रामीण मार्गांवरही मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. कारंजा (घा.) हा वर्धा जिल्ह्यातील तालुका आहे; पण तो नागपूर- अमरावती मार्गावर असल्याने येथे वर्धा जिल्हास्थळावरून बसफेऱ्या कमी आहेत. असाच प्रकार आष्टी (श.) तालुका व पुलगाव शहरासोबत घडतो. या मार्गांवर बसफेऱ्या कमी असल्याने अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. पुलगाव ते आर्वी, वर्धा ते राळेगाव, वर्धा ते हिंगणघाट, वर्धा ते कारंजा, आर्वी-तळेगाव ते आष्टी तथा कारंजा तालुक्यात सर्वच मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून अपघातही वाढत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीने जिल्हा त्रस्त
By admin | Published: March 27, 2017 1:11 AM