वर्धा : देशातील सर्वात छोट्या व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या गावांसाठी फायद्याच्या ठरणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंध नियंत्रणाचा प्रस्ताव गत दोन वर्षांपासून धूळखात आहे. याच पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी असलेल्या कॅटरिना (बीटीआर-३)ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) हिला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी वाघांसाठी पोषक असलेल्या वर्ध्यात प्रथमच टायगरला पकडण्यासाठी जंगलात पिंजरेही लावण्यात आले आहेत; पण वाघिणही सापळ्यांना हुलकावणीच देत आहे.
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. वर्धा जिल्ह्यात वन्यजीव संरक्षणासाठी वेळीच ठोस निर्णय घेता यावे, या हेतूने याच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंध नियंत्रणाचा (युनिफाईड कंट्रोल) प्रस्ताव ८ मे २०२० रोजी वन्यजीव विभागाच्या संबंधित बड्या अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. हा प्रस्ताव जंगलव्याप्त गावांमधील नागरिकांसाठी फायद्याचा असताना त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षच केले जात आहे. अगदी कासवगतीने या प्रस्तावाला संबंधितांकडे सरकवले जात आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात वाघांचे संवर्धन व्हावे, याविषयी वन्यजीव विभागाचे बडे अधिकारी सकारात्मक नाही काय, असा प्रश्न सध्या वन्यजीवप्रेमींकडे विचारला जात आहे.
आपत्कालीन परिस्थितीत ठोस निर्णय घेताना येतात अडथळे
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनची जबाबदारी सद्य:स्थितीत प्रादेशिक वन विभागाकडे आहे; पण आपत्कालीन परिस्थितीत कुठलाही ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडताना दिसते. इतकेच नव्हे तर विविध अडथळेही येत असल्याचे वास्तव आहे. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन या हेतूने युनिफाईड कंट्रोल प्रस्तावावर ताबडतोब शिक्कामोर्तब हाेणे गरजेचे आहे.