वर्धा : गेल्या १५ दिवसांपासून आर्वीसह तालुक्यातील दमट धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात आले. यावर अज्ञात रोगाच्या आक्रमणाने तूर पीक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगामुळे उभे तूर पीक जागीच वाळले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेतच तुरीवर हे संकट ओढावल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे
आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. यात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते; परंतु या अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे तूर पीक पूर्णतः वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरण दमट व ढगाळ असल्याने तुरीला मिळणाऱ्या उन्हाअभावी त्यातच सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बसल्याने रब्बी हंगामाचे तूर पीक या नैसर्गिक संकटात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.
तुरीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
आर्वी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून टाकली आहे. आता तूरही वाळत चालली असून शेंगा धरलेल्या आहेत. त्याचे फार उत्पन्न होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात उभ्या तूर पिकावर रोग आला असून शेंगावर आलेले तुरीचे पीक वाळत चालले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले तुरीचे पीक पूर्णतः हातचे गेलेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसामोर जगण्यामरण्याचे प्रश्न तयार झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत त्वरित तूर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
जंगली श्वापदानी तुरीचे पीक केले नष्ट
पूनम अनिल देशमुख यांचे रोहना शिवारात शेत आहे. त्यांनी खरिपाची माडी तूर पीक पेरले होते. १५ ते २० दिवसात पीक कापणीला येणार होते. अशातच रात्री जंगली श्वापदानी घुडघुस घालून संपूर्ण तीन एकरातील तुरीचे पीक मोडून नष्ट केले. यात शेतकऱ्याचे २० ते २२ पोते तुरीचे नुकसान झाले आहे.