सेलू : स्वातंत्र्यदिनी घोराड ग्रा.पं. कार्यालयात ग्रामसभा पार पडली. यात ग्रामस्थांनी अनेक ठराव पारित केले; पण त्यावर अद्यापही अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे पारित ठरावांवर त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ३०० हून अधिक ग्रामस्थांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष मतदान प्रक्रियेतून निवडण्यात आला. शासकीय परिपत्रकाचे वाचन होताच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. यामुळे ग्रा.पं. सदस्यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. यानंतरही पाच तास चाललेल्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. ग्रामसभेला मोठी उपस्थिती असल्याने ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांचा पाढाच वाचला. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात ग्रामसभेत निवडलेल्या समित्यांना अधिकार देणे, पाणी पुरवठा समितीचा रेकार्ड नवीन समितीकडे देणे, गाळ उचलण्याकरिता फंटिग यांचा असलेला मालवाहू आॅटो बंद केल्याबाबत, ग्रा.पं. आवारात टाकलेला मुरूम व चुरीची निविदा व देयकाची सखोल चौकशी, ग्रा.पं. कर्मचारी प्रवीण माहुरे यांना पदावर पूर्ववत घेणे, १३ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत भवन दुरूस्तीमध्ये झालेली अनियमितता आदी विषयांचा समावेश आहे. याबाबतच्या चौकशी व कारवाईसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही पं.स. सदस्य रजनी तेलरांधे, कृउबासचे संचालक संजय तडस, माजी उपसरपंच विलास खराबे, दीपक झोरे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर धूर्वे, महेंद्र माहुरे, पंढरी धोंगडे आदींनी दिला आहे.(शहर प्रतिनिधी)
ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी करा
By admin | Published: September 09, 2015 2:18 AM