लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : आगामी निवडणूक तसेच सण आणि उत्सवादरम्यान परिसरात शांतता कायम रहावी या हेतूने वर्धा शहर पोलिसांनी स्थानिक आनंदनगर तर सेलू पोलिसांनी हिंगणी शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले आहे.वर्धा शहरातील आनंदनगर भागात मनमर्जीने गावठी दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या निर्देशानुसार शहर ठाण्यातील स. फौ. बाबाराव बोरकुटे, महादेव सानप, गितेश देवघरे, विकास मुंडे यांनी रुकसाना बेग यांच्या मालकीच्या गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकला. तेथून पोलिसांनी दोन लोखंडी ड्रम मध्ये १०० लिटर उकळता मोह रसायण सडवा, दहा लोखंडी ड्रम मधील कच्चा मोह रसायण सडवा, दोन प्लॉस्टीक डबकीतील २८ लिटर गावठी मोह दारू तसेच दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण ६६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर सेलू पोलिसांनी हिंगणी शिवारात वॉश आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारूगाळण्याचे साहित्य जप्त केले आहे. बोर नदीच्या काठावर मनमर्जीने गावठी दारू गाळल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सेलू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही पारधी बेड्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असून तेथेही विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
आनंदनगरासह हिंगणी शिवारात राबविली वॉश आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM