वर्धा : येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी हिंदी साहित्यिकांनी आपले जबरदस्त भाषा आणि वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित करून अमिट छाप उमटवली. गांधी-बापूच्या भूमीत आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर सुरू झाला. देशातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि गझलकार या संमेलनात सहभागी झाले आहेत. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि अन्य मान्यवरांसह डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी तसेच डॉ कुमार विश्वास हे दोन ख्यातनाम हिंदी साहित्यिक सुद्धा हजर होते.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अनेकांनी भाषणे केली. मात्र, या उद्घाटन सोहळ्यात हिंदीत भाषण करणाऱ्या डॉ तिवारी आणि डॉ विश्वास या दोघांची बातच काही और असल्याचे श्रोत्यांनी प्रचंड दाद देऊन अधोरेखित केले. तिवारी यांनी आपल्या भाषणातून देशात रामायण आणि महाभारत या दोनच भाषा असल्याचे नमूद केले. भाषा आणि शब्द नसते तर जग अंध अपंगा सारखे झाले असते, असेही ते म्हटले. मराठी भाषिक ज्या गर्वाने त्यांच्या भाषेचा गौरव करतात ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, महादेवी वर्मा आणि अशाच विख्यात साहित्यिकांच्या साहित्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी भाषेचे महत्त्व पटवून दिले. भाषेला लेखक कशा पद्धतीने समृद्ध करतात आणि त्यामुळे भाषेसोबतच व्यक्तीही कसा ऊर्जावान बनतो त्याचाही दाखला त्यांनी दिला. त्यानंतर झालेले कुमार विश्वास यांचेही भाषण कमालीचे भाव खाऊन गेले सर्वांचीच नाराजीकुमार विश्वास यांना आयोजकांनी केवळ पाच मिनिटे दिली, ही बाब उपस्थित साहित्यिक, कवी, गझलकार अन सामान्य श्रोत्यांनाही खटकली. ती अनेकांनी बोलून दाखवली. एकूणच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर सोहळ्याच्या मंचावर तिवारी तसेच विश्वास यांनी हिंदी भाषेतून समृद्ध वक्तव्य करून आपली छाप सोडली.