ग्रामस्थ त्रस्त जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी मध्यरात्री आग लागून स्फोट झाला. यामुळे लगतच्या आगरगाव, पिपरी व नागझरी येथील नागरिकांच्या घरांना तडे गेले. सात महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्वरित नुकसान भरपाई द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयातच आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा आगरगाव येथील रवींद्र अंदुरकर यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी मध्यरात्री बॉम्बचे स्फोट झाले. यामुळे सीएडी कॅम्प परिसरातील आगरगाव, पिपरी व नागझरी या गावांना जबर हादरा बसला. यात तीनही गावांतील २५७ कच्ची घरे आणि ३६४ पक्क्या घरांचे नुकसान झाले. तत्सम अहवाल तयार करून पाठविण्यात आला; पण संबंधित विभागाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. २५७ कच्च्या घरांसाठी ८ लाख २२ हजार ४०० तर ३५४ पक्क्या घरांसाठी १८ लाख ९२ हजार ८०० असे ६२१ घरांसाठी २७ लाख १५ हजार २०० रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी लेखाशीर्ष २२४५-०२७१ अंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्त कार्यालय नागपूर येथे कळविले. ज्या घरांचे नुकसान झाले, त्यांना ७ महिन्यांचा कालावधी लोटूनही भरपाई मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. आगरगावच्या रवींद्र अंदुरकर या शेतकऱ्याने मात्र त्वरित भरपाई न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराच निवेदनातून दिल्याने खळबळ माजली.(कार्यालय प्रतिनिधी)
स्फोटातील नुकसान भरपाई अद्याप अप्राप्त
By admin | Published: December 26, 2016 2:07 AM