गजानन चोपडे, राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा): ‘गेल्या दोन दिवसांपासून सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या ८५ वर्षांच्या बाबांना आणि ८८ वर्षांच्या डॉ. सुधीर रसाळ या त्यांच्या मित्राला संमेलनस्थळी वेळोवेळी अडविण्यात आले. मुख्यमंत्री आले तेव्हा ९०० पोलिसांचा ताफा होता आणि आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून चोख बंदोबस्त होता. मी प्रत्येकवेळी पोलिसांना विनंती करून तर कधी ओरडून मार्ग काढला; पण आज संयम संपला आहे. गंमत आहे सगळी’, या भाषेत ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी आपला संताप व्यक्त केला. संमेलनाध्यक्षांनाच जर नियोजनाचा अभाव असलेल्या आयोजनाचा फटका बसत असेल, तर इतर साहित्य प्रेमींबद्दल न बोललेलेच बरे, असा नाराजीचा सूरही आता उमटू लागला आहे.
त्याचे झाले असे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी ११ वाजताच्या सुमारास संमेलनाच्या व्यासपीठावर आगमन झाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेल्या उद्घाटन सत्रात निदर्शकांनी एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे अलर्ट मोडवर असलेले पोलीस अत्यंत सावध होते. प्रत्येकाची कसून चौकशी केली जात होती. दरम्यान, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे संमेलनस्थळी आगमन झाले. त्यांच्या सोबत त्यांची कन्या भक्ती चपळगावकर आणि डॉ. सुधीर रसाळ होते. मात्र त्यांच्या वाहनाला प्रवेश नाकारण्यात आला. भक्ती वारंवार सांगत होते. हे संमेलनाध्यक्ष आहेत, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते मात्र पोलीस ऐकत नाही बघून त्या जाम संतापल्या. अखेर पोलिसांनी त्यांच्या वाहनाला आत प्रवेश दिला.