वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. राज्यातील एकूणच पराभवावर ‘चिंतन’ करण्यासाठी मुंबईत भाजपने बैठकींचा सपाटा लावला आहे. या बैठकांमध्ये पराभव झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जात आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. त्यात भाजपचे दोन आकडी संख्येतही खासदार निवडून आले नाहीत. त्यामुळे भाजपने आता पराभवाचे ‘आत्मचिंतन’ सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ९ जूनला राज्यातील भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभव स्वीकारण्यात आला. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी नेमके काय करावे, आदी मुद्यांवर विचारमंथन करण्यात आले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या राजीनाम्याला विरोध करून त्यांनीच उपमुख्यमंत्रिपदी कायम राहावे, असा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव पक्षाला पाठविण्यात आला आहे.
आमदारांच्या बैठकीनंतर १४ जूनला मुंबईत पराभूत उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. आपल्या उमेदवाराच्या पराभवाचे नेमके कारण काय? यावर चर्चा झाली. प्रथम या बैठकीत केंद्रात सत्ता स्थापन केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर पराभवाची मिमांसा करण्यात आली. आपण का हरलो, हाच बैठकीचा प्रमुख मुद्दा होता. पराभवाची समीक्षा करून राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले. पराभूत उमेदवारांनाही आपण कसे हरलो, याबाबत विचारणा करण्यात आली. कोणते मुद्दे पराभवाला कारणीभूत ठरले, याचा उहापोह करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले नाही, कोणी काम केले नाही, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
प्रवीण दटके घेणार पराभवाचा आढावालोकसभेत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पक्षाने आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी संबंधित लोकसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वर्धा लोकसभेसाठी नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. ते येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघात दाखल होऊन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत.
पदाधिकाऱ्यांना बसणार झटकालोकसभेत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांना नजीकच्या काळात झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे निरीक्षक आपल्या भेटीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी काम केले, कोणी काम केले नाही, यावर ‘फोकस’ ठेवणार असल्याचे सांगितले जाते. पदाधिकाऱ्यांच्या गावात ‘आपल्या’ आणि ‘विरोधी’ उमेदवाराला किती मते पडली, याचाही आढावा घेतला जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या गावातही पक्षाच्या उमेदवाराला किरकोळ मते पडल्याचे सांगितले जात आहे. अशा पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी तर होणार नाही ना? अशी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांची गोची होण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पराभवाचा आढावा घेण्यात आला. पराभवाची कारणे शोधण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते लवकरच मतदारसंघात दाखल होतील.- रामदास तडस, माजी खासदार तथा भाजप उमेदवार, वर्धा