लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडविल्याने प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे. कोणत्या गावात, शेतात, घरात पाणी शिरले तर मदतीकरिता महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते म्हणूनच वर्धा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे यांनी लागलीच उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले. त्यांनी तीन घटनांमध्ये स्वत: पुढाकार घेत काहींचे प्राण वाचविल्याने ‘हे तहसीलदार नाही तर खुद्द देवदूतच’ अशा प्रतिक्रियाही घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात.अधिकारी हे लोकसेवक असून त्यांच्या कामातूनच ते लोकप्रिय होत असतात. अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखविली तर नागरिकही त्यांना डोक्यावरच घेतात. असाच प्रकार वर्ध्यातील तहसीलदार रमेश कोळपे यांच्याबाबत घडला आहे. वर्धा तालुक्यातील कोसळधारमुळे देवळी-पुलगाव मार्गावरील धोत्रा शिवारातील नाल्याला पूर आल्याने शेतात कामानिमित्त गेलेले दहा ते पंधरा मजूर शेतातील बांधावर अडकून पडले होते. याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांना सायंकाळी मिळताच कोणताही विलंब न करता ते तातडीने सायंकाळीच गावात पोहोचून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या गावात उपस्थित राहून पुढील कार्यवाही केली. त्यानंतर दोन दिवसांतच पवनार येथील धामनदीपात्रात एक युवक अडकल्याने तेथेही ते आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. याही ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्यासह धाडसी वृत्तीचा परिचय सर्वांना करून दिला. स्वत: नदीपात्रात उतरुन त्यांनी युवकाला सुखरुप बाहेर काढण्याची मोहीम फत्ते केली. एका आठवड्यात पूरपरिस्थितीमुळे एका पाठोपाठ तीन घटना घडल्या या तिन्ही घटनेमध्ये वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे कर्तव्यदक्षतेने खरचं ‘हिरो’ ठरले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांचीही साथ- वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथील प्रशासनाला नेहमीच अलर्ट राहावे लागते. त्यामुळे येथील उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा, देवळी व सेलू या तिन्ही तालुक्यात आपत्ती काळात विशेष कर्तव्य बजावले जात असल्याचे आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे. कोरोनाकाळ असो की आता पूरपरिस्थिती उपविभागीय अधिकारी बगळे नेहमीच तिन्ही तालुक्यावर लक्ष ठेवून असतात. या आठवड्यात तालुक्यात तीन ठिकाणी पूर परिस्थितीमुळे आपत्ती निर्माण झाल्याने तहसीलदार रमेश कोळपे यांच्या पाठीशी तेही खंबीरपणे उभे राहिले आहे. इतकेच नाही धोत्रा येथील बचाव कार्यात तेही आघाडीवर होते. त्यांनीही पाण्यात उतरुन उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या सहकार्याने खिंड लढविली.