लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याचा महत्त्वाचा भाग म्हणून चारही विधानसभा क्षेत्राची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर मतदार यादीनुसार चारही विधानसभा क्षेत्रात २५ हजार ६७५ हजार मतदार वाढले आहे. आचारसंहितेच्या पार्शभूमीवर निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. चार विधानसभा क्षेत्रांत एकूण ११ लाख १९ हजार मतदार हक्क बजावणार आहे.
येत्या काळात राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे पुढारी व त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी म्हणून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. अंतिम मतदार यादी जाहीर केली. अंतिम मतदार यादीनुसार वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात २लाख ९० हजार २५८ मतदार आहे. यात १ लाख ४५ हजार ६४७ महिला, १ लाख ४४ हजार ५९९ पुरुष तर १२ इतर मतदारांचा समावेश आहे. हिंगणघाट विधनसभा मतदार क्षेत्रात २ लाख ९४हजार ६२९ मतदार, देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ७१ हजार ७६९ मतदार आहेत. आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ६२ हजार ७५५ मतदार आहे.
९ हजार १९२ पीव्हीटीजी मतदार भटक्या-विमुक्त जमातींच्या व असंरक्षित आदिवासी गट समाजाची मतदार नोंदणी व्हावी या हेतूने। जिल्ह्यात विशेष मतदान नोंदणी शिबिर घेण्यात आले. जिल्ह्यातील ८५ गावांत ४ हजार ३३० मतदार असून नवीन १०८ मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ९जार १९२ पीव्हीटीजी मतदारांची नोंद घेण्यात आली आहे.
८,७६२ दिव्यांगाची नोंद जिल्ह्यात ८ हजार ७६२ दिव्यांग मतदारांनी त्यांचे नावासमोर मतदार यादीमध्ये अपंगत्वाची नोंद केली आहे. नवमतदारांची मोठ्या संख्येने नोंदणी व्हावी यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विशेष शिबिरे घेण्यात आली. याच शिबिरांच्या माध्यमातून १६३४ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. अंतिम मतदार यादीनुसार १८ ते १९ वयोगटातील मतदारांची २.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे