पुलगावात प्रकार नित्याचाच : आरक्षित तिकीटांसाठी मारामार; ‘कम्प्लेंट बुक’चाही अभाव वर्धा : रेल्वे प्रवाशांना सुविधा पुरविण्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात; पण अधिकारी, कर्मचारी त्या प्रयत्नांना सुरूंग लावत असल्याचेच दिसते. पुलगाव येथील रेल्वे स्थानकावर कर्तव्याच्या वेळी कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आरक्षित तिकीटे घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना ताटकळावे लागते. मंगळवारी सकाळीच या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने प्रवाशांत असंतोष पसरला आहे. पुलगाव रेल्वे स्थानकावर तीन तिकीट खिडक्या आहेत. यातील एक खिडकी आरक्षित तिकीटांसाठी राखीव आहे. आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची गर्दी असल्यास या खिडकीतून साधारण तिकीट दिली जात नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत या तिकीट खिडकीमध्ये कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. परिणामी, तिकीट घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बराच वेळ ताटकळावे लागले. याबाबत स्टेशन प्रबंधकांकडे तक्रार करण्यास गेले असता त्यांनी बुकींग आॅफीसमध्ये तक्रार करा, असा सल्ला देत प्रवाशांना परत पाठविले. बुकींक आॅफीस प्रमुख सकाळी १० वाजतानंतरच येत असल्याने प्रवाशांना तक्रार करता आली नाही. असे असले तरी संबंधित प्रवाशांनी याबाबत खा. रामदास तडस यांना दूरध्वनीवर माहिती देत तक्रार केली आहे. पुलगाव रेल्वे स्थानकावर हा प्रकार नित्याचाच झाला असून साधारण तिकीट खिडक्यांवरही प्रवाशांची ताटकळ होते. कधी एकच कर्मचारी असतो तर कधी सावकाश कामे केली जातात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकांवर असुविधा; प्रवासी त्रस्त
By admin | Published: April 19, 2017 12:38 AM