वन विभागाचे दुर्लक्ष : वन्य प्राण्यांची गावांकडे धावआकोली : जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी गाव शिवाराकडे धाव घेत असल्याचे दिसते. परिणामी, शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वनविभाग दखल घेऊन शिकारीला आळा घालणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसरात खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्र एकमेकाला जुळलेले आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रात दाट वनराजी असल्याने येथे हरिण, रानडुक्कर, रोही या प्राण्यांसह भोर, रानकोंबडी, लावे, तितर हे पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाची काहिली वाढली आहे. तप्त झळांनी वन्य पशु-पक्ष्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अशात जंगलातील नैसर्गिक पाण्याचे झरे कधीचेच आटले असून पाणवठेही कोरडे पडत आहेत. यामुळे आपली तृष्णा भागविण्यासाठी वन्यजीव गाव शिवाराकडे धाव घेत आहेत. जंगलाकाठी असलेल्या विहिरीवर पाण्याची सोय नाही. गावाशेजारी असणाऱ्या शेतातच शेतकरी चारा, पीक, ऊस, भाजीपाला ही पिके घेतात. यामुळे स्वाभाविकपणे पाणीही गावाशेजारी उपलब्ध होत असल्याने वन्यजीवांनी आपला मोर्चा गावांकडे वळविला आहे. या संधीचा फायदा शिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळांमुळे वन कर्मचाऱ्यांची गस्त कमी झाली आहे. यामुळे केलेल्या शिकारीची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. रानडुकराची तर दररोजच शिकार केली जात असल्याचे दिसते. दुचाकीवर मारलेले रानडुक्कर नेताना दिसतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोराच्या शिकारीची सुद्धा चर्चा आहे. शिकारीसाठी काही गावे कुख्यात आहेत; पण केलेली शिकार उघड होत नाही. सामान्यांना माहिती असते; पण वनविभागाला ती दिली जात नाही. याकडे लक्ष देणेच गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
पाणवठे आटल्यामुळे शिकारीच्या प्रमाणात वाढ
By admin | Published: April 21, 2017 1:59 AM