लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली असली तरी सध्या डेंग्यू व व्हायरल फ्लूने चांगलेच डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांना तापाची लागण झाल्याने नेमकी लस केव्हा घ्यावी, असा प्रश्न लाभार्थ्यांना सतावत आहे. एकूणच तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत्येक घरी ताप-सर्दी-खोकल्याचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे; परंतु ताप-सर्दी-खोकल्याची लागण झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी की नाही, शिवाय कोविडची लस नेमकी केव्हा घ्यावी, असा प्रश्न लाभार्थ्यांना सतावत आहे. अशातच सोशल मीडियावर काही गैरसमज पसरविले जात असल्याने याचा थेट परिणाम काेविड लसीकरण मोहिमेवर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील आरोग्य यंत्रणेकडून कोविड लसीकरणाबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.
काय म्हणतात वैद्यकीय तज्ज्ञअंगात ताप असताना रुग्णाने कोविडची लस घेतल्यास काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे तापाची लागण झालेल्या रुग्णाने ताप उतरल्यावर किमान पाच दिवसांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लस घेतल्यावर ताप येणे हे लसीचा सौम्य प्रतिकूल प्रतिसाद असतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी सांगितले.
३० दिवसांत झाली १२९ नव्या डेंग्यूबाधितांची नोंदजिल्ह्यात आतापर्यंत ३८९ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात २१२ पुरुष, तर १७७ महिलांचा समावेश आहे. असे असले तरी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात तब्बल १२९ नवीन डेंग्यूबाधित आढळले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
बडे अधिकारी जाताहेत गावागावातजिल्ह्यातील एकही लाभार्थी कोविड प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये, तसेच वर्धा जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा या हेतूने जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनात गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.