आॅनलाईन लोकमतवर्धा : स्थानिक नगर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी पालिकेच्यावतीने सभेत मालमत्ता करात २० टक्क्याने वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते; पण त्याला सर्व नगरसेवकांनी विरोध दर्शविला. चर्चेअंती १० टक्के कर वाढविण्याला एकमताने संमती देण्यात आली. यामुळे येत्या काही दिवसांत शहरवासीयांना वाढीव कराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.प्रत्येक पाच वर्षांनंतर पालिकेच्यावतीने मालमत्ता करात वाढ केली जाते. त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वर्धा शहरातील मालमत्तांचे सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या कालावधीकरिता महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११४ नुसार चतुर्थ वार्षिक फेरमुल्यांकन भाडेमुल्य पद्धतीने करण्यासाठी नवीन कर आकारणी दरात २० टक्के वाढ करण्यास मान्यता प्रदान करण्याचा ठराव सादर करण्यात आला. सदर ठराव सर्वसाधारण सभेत सादर होताच सभागृहात उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने २० टक्के कर वाढीला विरोध दर्शविला.यानंतर झालेल्या चर्चेअंती सभागृहातील उपस्थित सर्व न.प. सदस्यांनी १० टक्के मालमत्ता कर वाढीला बहूमताने हिरवी झेंडी देत ठराव पारित केला. सदर ठरावाला न.प. सभागृहाने मंजुरी दिल्याने मालमत्ता कर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण अंतिम निर्णय नगर रचनाकार विभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.नियमावलीत ४० टक्केपर्यंत वाढची तरतूदपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी व नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्याच्या उद्देशाला केंद्रास्थानी ठेऊन प्रत्येक पाच वर्षांनी नगर पालिकेच्यावतीने मालमत्ता करात वाढ केली जाते. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार पालिकांना मालमत्ता करात ४० टक्केपर्यंत वाढ करून घेता येत असल्याचे सांगण्यात आले.अंतिम निर्णयाचा अधिकार नगर रचनाकार विभागाला२० टक्केला विरोध दर्शवित १० टक्के मालमत्ता कर वाढीचा ठराव वर्धा न.प.च्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. नागरिकांकडून मालमत्ता कर आकारणीसाठी महत्त्वाचा भाग असलेल्या चतुर्थ वार्षिक फेरमुल्यांकरनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. वर्धा नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराघरातून सध्या माहिती घेतल्या जात आहे. ही माहिती एकत्र करून ती कर मुल्यांकन निर्धारण अधिकारी असलेल्या नगर रचनाकार विभागाला पाठविण्यात येणार आहे. त्यावर अंतिम निर्णय नगर रचनाकार विभाग घेणार आहेत.प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. घेण्यात आलेला ठराव त्या प्रक्रियेतीलच एक भाग आहे. वाढीव करामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार असून नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्यास मदत होणार आहे.- रवींद्र जगताप, कर अधीक्षक, न.प., वर्धा.
शहरवासीयांना सहन करावा लागणार वाढीव कराचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:37 PM
स्थानिक नगर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत २० टक्केला विरोध : १० टक्के वाढीला दिली संमती