लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या जन्मदिनी निवासस्थानी धान्य वाटप कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, निवासस्थानी धान्याकरिता नागरिकांची गर्दी वाढविणे हे विरोधकांचेच षडयंत्र असल्याचा आरोप आमदार दादाराव केचे यांनी केला आहे.सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन असतानाही रविवारी आमदार दादाराव केचे यांच्या जन्मदिनानिमित्त गरजूंना धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. नागरिकांनी सकाळपासून आमदार केचे यांच्या साईनगरस्थित निवासस्थानी धान्य घेण्याकरिता गर्दी केली होती. काही वेळातच ही गर्दी चांगलीच वाढल्याने संचारबंदीचे व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व्हायला सुरुवात झाली. एका सुज्ञ नागरिकाने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. काहींनी या गर्दीचे छायाचित्र व चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाल्याने प्रशासनही जागे झाले. पोलिसांनी लगेच आमदारांचे निवासस्थान गाठून नागरिकांची गर्दी पांगविली. फौजदार गोपाल ढोले यांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गर्दी करू नका, घरपोच धान्य मिळेल अशा सूचना नागरिकांना दिल्या. गर्दी कमी होत नसल्याने ठाणेदार संपत चव्हाण यांनी डॉ. राणे व डॉ. धरमठोक यांच्या दवाखान्याजवळ नाकाबंदी केली. त्यानंतरही नागरिकांचे लोंढे कायमच राहिल्याने अनेकांना पोलिसांचा प्रसादही खावा लागला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या आदेशावरून पोलिसांनी रात्री उशिरा आमदार दादाराव केचे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.माझ्या वाढदिवसानिमित्त २१ गरजूंना धान्य वाटप करण्याचे ठरविले होते. त्यानुसार मी २१ जणांना धान्य वाटप करून वलीसाहेब महाराजांच्या दर्शनाला निघून गेलो होतो. मात्र, विरोधकांनी धान्य वाटप सुरू असल्याचा प्रचार करीत नागरिकांना माझ्या घरी पाठविले. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. विरोधकांच्या या षड्यंत्राचा मी धिक्कार करतो. आमचा मदतीचा हात नेहमीच गरिबांसाठी पुढे असतो, त्यामुळेच नागरिकांनी विरोधकांचा एकछत्री अंमल संपविला आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आधल्या दिवशीच नागरिकांना आवाहन करून घरी येऊन शुभेच्छा देऊ नका, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन करा, असे सांगितले होते.- दादाराव केचे, आमदार.
आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थासमोर जमलेल्या गर्दीसंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.- संपत चव्हाण, ठाणेदार, आर्वी.