लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्यात आंब्याची वाढती मागणी असून हापूसपेक्षाही गावराणी आंब्यांना ती अधिक असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पूर्वी प्रत्येक गावात १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याची अमराई असायची. कालांतराने या आमराई दुर्मीळ झाल्या आहे. त्यामुळे आज आम्रवृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे.चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये काही प्रमाणात गावरानी आंब्याची झाडे आहेत. या आम्रवृक्षाचे आंबे हल्ली चांगले भरल्यामुळे व सकस आल्यामुळे आंबे तोडण्यास सुरुवात झाली आहे. गावरानी आंब्याला शहरी भागात अधिक प्रमाणात मागणी असते. देशी आंबे सुंगधित व रुचकर असल्यामुळे या आंब्याचे लोणचे तयार करण्याकरिता विशेष मागणी असते.पौष महिन्यात आम्रवृक्षाला आलेल्या बहराचे आंबे मे महिन्यात तोडण्यास सज्ज झाले असल्याने पढेगाव येथे आंबे तोडण्यास सुरुवात झाली आहे.आधुनिकतेमुळे जीवनाचा प्रवाह बदलत चालला असला तरी ‘जुने ते सोने’ या म्हणीच्या वास्तव्याची अनुभूती आल्याखेरीज राहवत नाही. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत आम्रवृक्षाचे महत्त्व अबाधित आहे. मात्र नामशेष झालेली आमराई पुन्हा निर्माण करणे आवाक्याबाहेर आहे.सगळ्याच मुलांना नामशेष झालेली मामाच्या गावची आमराई पुनर्जीवित व्हावी, असे वाटत आहे. सध्या तरी गावरानी आंब्याची चवही दुर्मीळच झाल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. एकट-दुकट राहिलेली आंब्याची झाडे नव्या पीढिला खुणावत आहे. त्यामुळे आमराईचे पुनर्जीवन व संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे.
गावराणी आंब्यांना वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:45 PM