वर्धा : २०१४ मध्ये राज्यासह जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती आणि आघाडी करून चारही पक्ष लढले. यावेळी सहा प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैदानात उभे ठाकले आहे.
२०१४ मध्ये जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना आणि एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी वर्ध्यातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पक्ष आणि इतर पक्ष व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. हिंगणघाट, आर्वी, देवळीतही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांसह बहुजन समाज पक्ष, अपक्ष मैदानात होते. त्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या.
२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निर्माण झाली. त्यात वर्ध्यात भाजप, काँग्रेस, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, देवळीत काँग्रेस, शिवसेना आणि आर्वीत काँग्रेस अन् भाजपचे उमेदवार आहे. त्यावेळी देवळीत युतीतील भाजपमध्ये ‘बंडखोरी झाली होती. हिंगणघाटमध्येही युतीत शिवसेनेच्या उमेदवारी बंडखोरी केली होती. २०१९ मध्ये दुरंगी लढती झाल्या होत्या. देवळीत तगडा बंडखोर मैदानात असल्याने तिरंगी सामना झाला होता.
२०२४ मध्ये समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मधल्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन छकले झाली. त्यात महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना, तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेना सहभागी आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होते. काही ठिकाणी तगडे अपक्षही मैदानात उभे ठाकले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत गाजला वर्धा पॅटर्नसहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्यात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत सामना झाला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. मात्र, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गुंता कायम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा परंपरागत असल्याने काँग्रेसचाच उमेदवार देण्याची मागणी केली होती. अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झोळीत पडली. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळी हा ‘वर्धा पॅटर्न’ चांगलाच गाजला होता.
आर्वीत सर्वाधिक, तर हिंगणघाटमध्ये कमी उमेदवारविधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या चार मतदारसंघातून ६० उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात सर्वाधिक १८ उमेदवार आर्वी मतदारसंघात असून सर्वात कमी १२ उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत. वर्धेच्या रिंगणात १६, तर देवळीतून १४ उमेदवार लढत देत आहे. हिंगणघाटमध्ये सर्वात कमी उमेदवार असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेनेचे बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. तथापि, या मतदारसंघात लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली होती, हे विशेष.