वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या आठ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पार करून भारत देश एका नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. शिवाय जगभर वेगळी छबी भारताने निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
खा. तडस म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राबवली आहे. कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांना मोफत धान्य देण्यात आले. इतकेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
मोदींच्या नेतृत्वातच देशाची ओळख सुरक्षित भारत, प्रतिष्ठित भारत, आत्मनिर्भर भारत म्हणून विकसित होत आहे. जनधन, उज्ज्वला, स्टार्टअप, जल जीवन मिशन, पीएम आवास, प्रधानमंत्री किसान सन्मान आदी योजना अनेकांना दिलासा देणाऱ्याच आहेत. तर जम्मू कश्मीर येथील कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतले असल्याचे तडस म्हणाले.
शहीद भूमीतून निघणार विकास यात्रा
केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरही पोहोचावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहीद भूमी अशी ओळख असलेल्या आष्टी येथून ११ जून रोजी विकास यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप १४ जून रोजी सेवाग्राम येथे होणार आहे. शिवाय जिल्ह्यात सेवा सुशासन गरीब कल्याण पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.