लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जगाला कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने त्रस्त केले आहे. जगभरात या आजाराने २६ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला. भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.डॉ. खांडेकर यांनी कोरोना व इतर साथीच्या आजारावर अभ्यास करून काही निष्कर्ष पुढे आणले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतात २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती. त्यात जवळपास २ हजार मृत्यू झालेत. मात्र, २०१४, २०१५, २०१६ व २०१७ चा वार्षिक मृत्यू दर बघितला तर वार्षिक सरासरी मृत्यूमध्ये फरक नव्हता. २०१४ मध्ये मृत्यूदर प्रतिहजार लोकसंख्येमागे ७.२० होता. २०१५ मध्ये ७.१९ तर २०१६ मध्ये ७.२०, २०१७ मध्ये ७.२१ असा राहिला आहे. यावरून हे स्पष्ट होते, की ज्यावेळी साथ येते त्यावेळी साथीमुळे मृत्यू जरी वाढले तरीही मृत्यूदर वाढत नाही, उलट कमी झालेला दिसतो. भारतात जवळपास २४ ते २५ हजार मृत्यू दर दिवशी होतात. वार्षिक जवळपास ८७ लाख मृत्यू होतात. मागील साथीच्या मृत्यूचा अभ्यास केला तर हे निदर्शनास येईल की, यात कोरोनाच्या केसेस जरी त्यात समाविष्ट केल्या तरी हा आकडा (म्हणजे वार्षिक मृत्यूसंख्या) २०२० च्या अखेरीस पाहिला तर त्यात वाढ झालेली दिसणार नाही. उलट पाश्चिमात्य देशाशी तुलना केली तर भारतात साथरोगाच्या आजाराने मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. युनायटेड स्टेटमध्ये २००९ च्या स्वाईन फ्ल्यूच्या साथीमध्ये ६०.८ मिलियन लोक बाधित झाले होते. त्यापैकी १२ हजार ४६९ लोक एका वर्षात मृत्युमुखी पडले. भारतात ही साथ त्यावेळी आली होती. मात्र, मृत्यू १ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू कमी होण्याचे कारण भारतीयांची रोग प्रतिकारकशक्ती, वातावरण, तापमान आदी बाबी कारणीभूत आहेत. भारतात दररोज ४०८ मृत्यू व वार्षिक १.५ लाख मृत्यू केवळ रस्ते अपघातामुळे होतात. एक लॉकडाऊन ठेवला तर हमखास १.५ लाख लोकांचा जीव भारतात वाचविला जाऊ शकतो, असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे.
जगाच्या तुलनेत भारतात साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. भारतात २००९ मध्ये साथ आली होती. त्याचा अभ्यास केला तर आजही आलेल्या कोरोनाच्या आजारात भारतीय लोकांवर आरोग्यदृष्ट्या दूरगामी परिणाम होतील, असे म्हणता येणार नाही.. - डॉ. इंद्रजित खांडेकर,न्यायवैद्यक शाखाप्रमुख, महात्मा गांधी आर्युर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.