सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वावर चालत सर्वांगीण विकासासाठी जे परिवर्तन बापूंना अपेक्षित होते ते सध्या घडत आहे. याला पुढे नेत असताना नवीन शिक्षा प्रणालीच्या माध्यमातून स्वभाषेत शिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपकडून सेवाग्रामपासून बाईक रॅलीचे आयोजन केले होते. याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी सेवाग्राम आश्रमात प्रार्थना केली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सेवाग्राम आश्रमात पोहोचताच आश्रम प्रतिष्ठानकडून सूतमाळा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्मारकांची माहिती घेतल्यानंतर बापू कुटीत प्रार्थना झाल्यानंतर बापू कुटी समोरील प्रांगणात सामूहिक सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत, वैष्णव जन तो भजन आणि शांती पाठ झाला.
‘बापूंनी सामान्य जनांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेतले. त्यांच्यामुळेच हा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. बापूंनी दरिद्र्य नारायणाच्या सेवेचा संदेश दिला होता. तेच कार्य पंतप्रधान गरीब कल्याण अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत. तीन कोटी लोकांना घरे, अडीच कोटी लोकांना सोयी, पाच कोटी लोकांना गॅस आणि नळ जोडणी दिली आहे’, असे सांगून सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीतून आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असेही फडणवीस म्हणाले. यानंतर प्रशासनातर्फे चरखागृहात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर कुणवार, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत, वासुदेव रोहणकर उपस्थित होते. त्यानंतर हुतात्मा स्मारक ते आर्वी नाक्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आश्रमात नोंदविला अभिप्राय...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने बापू कुटीला भेट दिली. भारताचा अमृतमहोत्सव बापूंमुळेच आपण अनुभवतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातून शक्य आहे. अंत्योदयाचा मंत्र सर्वसमावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अधिष्ठित समाज रचना, सर्वांना संधीची समानता आणि विचार, पूजा पद्धतीबाबत आदरभाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात गरिबांचे कल्याण म्हणजे बापूंनी सांगितलेली दरिद्र्य नारायणाची सेवाच होय. बापू कुटीत नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज व समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न सर्व मिळून करुया, असा अभिप्राय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविला.