लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलाव झालेल्या घाटांची मुदत संपत आली असतानाच आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूरच्या वाळू घाटधारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसखोरी चालविली आहे. बोटी आणि पोकलँडच्या सहाय्याने दिवसरात्र उत्खनन सुरु असूनही अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने या घाटधारकांना पाठबळ मिळत असल्याची ओरड होत आहे.आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे या घाटधारकाने वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतीलच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना त्याने लिलाव न झालेल्या अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतून वाळू उपसा सुरु केला आहे.हा उपसा करीत असताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून घाटधारकांने जागोजागी आपले सहकारी नेमले असून त्यांच्या माध्यमातून अवैध वाहतूक केली जात असल्याचीही आता ओरड होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांचीही वाट लागली असून परिसरातील नागरिकांचीच वहिवाट अडचणीत आली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.कोणी घेतलाय हा वाळूघाट?ईस्माईलपूरचा वाळूघाट पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरने संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला असून या घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून घाटाचा ताबा देण्यात आला. त्यामुळे या घाटातून त्याला १२ सप्टेंबरपर्यंत उपसा करता येणार आहे. परंतू या घाटातील वाळूसाठा पुर्ण उपसला असून आता अमरावती जिल्ह्याच्या हद्दितील वाळूचा उपसा सुरु केला आहे. शासनाकडून मिळालेली रॉयल्टी संपली असून जिल्ह्याबाहेरील वाळूचा व्यवहार आता चिठ्ठींव्दारे सुरु असून एका ट्रॅक्टरचे साडेसात हजार रुपये घेतले जात असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे नियमबाह्य सुरु असलेल्या या उत्खननाला आळा घालण्याची मागणी होत आहे.घाटधारकावर दंडात्मक कारवाई कराआष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर घाटधारकाने नियमबाह्यरित्या वर्धा नदी पात्रातीलच अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील तिवसा तालुक्याच्या फत्तेपूर (जावरा) या घाटातून वाळू उपसा सुरु केला आहे. त्याला तिवसा येथील तहसीलदारांचे पाठबळ मिळत आहे. या अवैध उत्खनना बाबत तिवसा येथील तहसीलदारांना अवगत केल्यानंतरही कारवाई होत नाही. यासंदर्भात आष्टीतील तहसीलदारांनी प्रशासनाला अहवाल सादर केला पण, कारवाई होत नसल्याने धानदांडग्या घाटधारकांमुळे प्रशासनही नतमस्तक असल्याचा आरोप होत आहे. या घाटधारकाविरुद्ध फौजदारीसह दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पिपल्स रिपल्बिकन पार्टीचे मेघराज डोंगरे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ईस्माईलपूरच्या घाटधारकाची घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM
आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला.
ठळक मुद्देसीमोल्लंघन करून उत्खनन : अधिकाऱ्यांचे पाठबळ