गत वर्षाच्या दुष्काळाची छाया : सजावटीच्या साहित्यात २५ ते ३० टक्क्यांनी वाढसिंदी (रेल्वे) : या वर्षी समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतकऱ्यांचा पारंपरिक व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा हा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. असे असले तरी यावर गतवर्षीच्या दुष्काळाची छाया असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच पोळा तोंडावर असतानाही बाजारात शेतकऱ्यांची गर्दी नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची पूजा करणाऱ्या पोळ्याला बळीराजाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. वर्षभर कष्ट करून हाती फारसे न लागता उलट कर्जाचे ओझे अंगावर घेणारा हा शेतकरी आज आर्थिक संकटात सापडत आहे. परिणामी बैलाचे पालन पोषण करणेही अनेकांना अवघड होत आहे. त्यामुळे शेतात राबणारे बैल कमी होऊन होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी पोळ्याच्या निमित्ताने किमान १५ दिवस आधी बैल सजविण्यासाठी शेतकरी वर्ग लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीकरिता धावपळ करीत होता. त्यासाठी परिसरातून विविध ठिकाणी लहान मोठी दुकाने थाटली जात होती, पण आता हा सण तोंडावर येऊनही बाजारात फारशी समाधानकारक उलाढाल होत नसल्याने दिसत आहे. नापिकीच्या संकटाचे सावट शेतकऱ्यांच्या या सणावर आल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)घोराडच्या पोळ्याला दीड शतकाची धार्मिक परंपरासेलू : विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या घोराड गावाला भरणारा पोळा हा धार्मिक परंपरचे प्रतिक असून दीड शतकापासून आजही ती परंपरा जोपासली जात आहे. सहा हजार लोकसंख्येचे गाव असून बहुतांश परिवार शेतकरी असून या गावात बैलांचा पोळा एकाच ठिकाणी भरत आहे.संत नामदेव महाराज समाधी मैदानावर बेलांचा पोळा भरतो प्रत्येक शेतकरी आपली बैलजोडी सजवून पोळ्यात आणतांना विठ्ठल रूखमाई मंदिराच्या परिकोटाला प्रदक्षिणा घालूनच बैलजोडी पोळ्याच्या रांगेत उभी केली जाते. बांधलेल्या तोरणाच्या मागे रांगा लागत असतात. विठ्ठल रूखमाई देवस्थान मधून टाळ मृदुंगाचा निनाद करीत भजनी मंडळी दिंडी संत नामदेव महाराज समाधी स्थळी येतात. यात शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य सामील होतात पोळ्यात असलेल्या बैलांच्या रांगांना ही दिंडी पाच प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर संत नामदेव महाराज समाधी स्थळी आरती केली जाते. आरती संपताच मशात पेटवून पोळा फुटतो. ही धार्मिक परंपरा असलेला पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येतात.संत केजाजी महाराज यांनी सुरू केलेली दीड दशकापूर्वीपासूनची परंपरा आजही घोराड येथे जोपासली जात आहे. हे विशेष!(शहर प्रतिनिधी)वृषभराजाच्या आभूषणांनी सजली बाजारपेठतळेगाव (श्यामजीपंत) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात व शेतकऱ्यांच्या आयुष्यात अन्यसाधारण महत्त्व असलेला सण म्हणजे पोळा. सदासर्वकाळ आपल्या धन्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलांचे या दिवशी सन्मानाने पूजन केले जाते. या दिवसापूरते का होईना, बैलांना साज श्रृंगाराने सजविले जातात. त्यामुळे पोळा सणानिमित्त वृषभांच्या विविध आकर्षक आभूषणांच्या विक्रीसाठी बाजारपेठ सजली आहे. बैलांच्या श्रृंगारामध्ये झुल, मोरके, वेसन, दोर, कवड्यांची माळ, प्लास्टिक कवड्या व नकली हिरा-मानकांच्या माळी, घुंगरांची चाळ, घंटी घुंगरू, टिमणी शिंगाच्या शेंड्या, गोंडे, पैजन, गेठा, साधे दोर, पैजनदोर, चवर, मठाटी, रंग व मोराची पंख इत्यादी वस्तुंनी बाजारात एकच गर्दी केली आहे. बाजारातील हे विविधारंगी साज श्रृंगार व आभूषणे पाहून याकडे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. पुर्वीपासून परंपरेने चालत आलेल्या पोळ्याच्या दिवसात बैलांचे पूजन आजही तितक्याच श्रध्देने केले जाते. आपल्यावरील उपकारकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अशी परंपरा जगाच्या पाठीवर कुठेच आढळून येत नाही. म्हणूनच भारतीय संस्कृतीचे आकर्षण आजही जगभरात कायम आहे. पोळ्याच्या महत्वाच्या सणासाठी बाजारपेठ सजली असली तरी या आभूषणांच्या खरेदीवर मागील वर्षीच्या दुष्काळाचे व मंदाच्याही दुष्काळी परिस्थितीचे सावट दिसून येत आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाच्या प्रकोपामुळे सातत्वाने आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात यावर्षीही दुष्काळ लिहिला जात असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही आपल्या पदरात काहीच पडणार नाही. याची जाणीव शेतकरी वर्गाला झाली आहे. त्यामुळे नैराशेच्या गर्तेत वावरत असलेला शेतकरी पोळ्याचा सण कसा साजरा करावा या विवंचनेत अडकला आहे.(वार्ताहर)
बळीराजाच्या पोळ्यावर महागाईचे सावट
By admin | Published: September 11, 2015 2:28 AM