लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल, यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न होत असतानाच चक्क जि.प.च्या उपाध्यक्षांच्या शेतातील कपाशी पिकावरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्येच खळबळ उडाली आहे. मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने काही परिसरांची पाहणी केली असता हे वास्तव पुढे आले. शिवाय परिसरातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.मागील दोन वर्षे सतत गुलाबी बोंडअळीने चांगलाच थैमान घातला. शिवाय, कपाशी उत्पादकांचे मोठे नुकसानही केले. त्यामुळे यंदा गुलाबी बोंडअळीला कसा अटकाव करता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. असे असतानाही सध्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पुढे आले आहे. मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर व काही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी आणि परिसरातील शेतातील पिकांची पाहणी केली. याच वेळी जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांच्या शेतातील पिकाचीही पाहणी करण्यात आली. बारकाईने पाहणी केली असता कपाशीच्या फुलात आणि अतिशय छोट्या प्रमाणात असलेल्या बोंडात गुलाबी बोंडअळी असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावाला वेळीच अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना कराव्या, असेही शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.लाईट लॅम्प फायद्याचासध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करीत आहेत. परंतु, ही औषधे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना न परवडणारीच आहे. पतंग अवस्थेत असलेल्या गुलाबी बोंडअळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लाईट लॅम्पचा वापर करावा. हा लाईट लॅम्प रात्रभर सुरू ठेवावा. १,००० वॅटचा बल्ब त्यात लावावा. कमी खर्चातील हा उपाय बोंडअळीला नियंत्रणात आणण्यासाठी फायद्याचा ठरणारा आहे.
आर्वी तालुक्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:19 PM
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल, यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न होत असतानाच चक्क जि.प.च्या उपाध्यक्षांच्या शेतातील कपाशी पिकावरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्येच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देजि. प. उपाध्यक्षांच्या शेतातही आढळल्या अळ्या