हिंगणघाट : आरएसआर मोहता जिनिंग अॅण्ड विव्हींग मिल व्यवस्थापन दोन वर्षांपासून कामगारांवर अन्याय करीत आहे. याबाबत अनेकदा कामगार मंत्री व आयुक्त नागपूर यांच्याशी व्यवस्थापनाच्या बैठकी घेतल्या; पण काहीही उपयोग झाला नाही़ अन्यायामुळे कामगार त्रस्त झाले असून व्यवस्थापनाला समज देण्याची मागणी निवेदनातून केली आहे़कपडा विभागातील ४१० कामगार कमी करण्यासाठी व्यवस्थापनाने औद्योगिक न्यायालय नागपूर येथे खटला दाखल केला़ न्यायालयात प्रकरण सुरू असताना व्यवस्थापन कामगारांना त्रास देत आहे. यामुळे कामगार त्रस्त झाले आहेत़ अलीकडे संबंधित को.वा. खात्यात बदली कामगारांना सुमारे ५ महिन्यांपासून बदली काम देण्यात येत नाही. त्यांना महिन्यात दोन ते तीन दिवस काम दिले जात आहे़ यामुळे या खात्यातील कामगारांसह राजू तिमांडे व आफताब खान यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले़ यात व्यवस्थापनाच्या अरेरावी धोरणाबाबत त्वरित बैठक बोलवून कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली़ मिल व्यवस्थापन कामगारांवर अन्याय करीत असल्याने असंतोष वाढला आहे. यासाठी कामगारांवरील अन्याय कमी करणे गरजेचे आहे. याबाबत अप्पर कामगार आयुक्त नागपूर यांनाही कामगारांनी निवेदन सादर केले़ व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे़ याप्रसंगी संघाचे सचिव आॅफताब खान, माजी आमदार राजू तिमांडे संघाचे उपाध्यक्ष विजय महाबुधे, शरद दांडेकर, अनवर खा नवाब खा, पद्माकर कोहपरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते. मोहता मिलच्या व्यवस्थापनाचा कामगारांवरील अन्याय असाच सुरू राहिला तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आफताब खान, राजू तिमांडे व कामगारांच्यावतीने निवेदनातून देण्यात आला आहे़(तालुका प्रतिनिधी)
मोहता मिलमध्ये कामगारांवर अन्याय
By admin | Published: March 30, 2015 1:39 AM