वर्धा : देशात खळबळ उडवून देणा-या महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणातील आरोपी कुणाल राजाभाऊ वैद्य याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्वाळा मुख्य न्याय दंडाधिकारी ए. ए. अयाचित यांनी दिला. सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमातील बापू कुटीत त्यांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यापैकी त्यांचा चष्मा चोरी गेल्याने जिल्ह्यासह देशात खळबळ उडाली होती.या चष्माचोरीबद्दल आश्रम प्रतिष्ठानने सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती. परंतु वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष मारुती म. गडकरी व प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी बैठक घेऊन १३ जून २०११ ला सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बराच काळ प्रकरणाचा उलगडा न झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने या प्रकरणी कुणाल राजाभाऊ वैद्य (रा. हिंदनगर) याला अटक केली होती.तेव्हा कुणाल हा तांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कोर्स करीत होता. त्याला अटक झाल्यानंतर उच्च न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली होती. या प्रकरणाचे दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी वकिलांनी या प्रकरणात बरेच साक्षीदार तपासले. आरोपी कुणालच्या वतीने अॅड. रोशन राठी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून मुख्य दंडाधिकारी ए. ए. अयाचित यांनी सबळ पुराव्यांअभावी कुणालची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.
गांधीजींच्या चष्मा चोरीतील आरोपीची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 6:05 PM