पंतप्रधानांना आर्य समाज मंदिरचे साकडेवर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. यात त्यांना हजारो हेक्टर जमीन प्राप्त झाली; पण यातील जमीन वाटपात मोठा घोळ करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी आर्य समाज आराधना मंदिरच्यावतीने करण्यात आली. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.भूदानात प्राप्त जमिनीचा मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. हा प्रकार केवळ वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर सबंध राज्यात घडला. यातील जमिनींवर ले-आऊट विकसित झाले असून बहुतांश जमिनींचा व्यावसायिक वापर होत आहे. ही बाब माहिती अधिकारात प्राप्त माहितीमध्ये निष्पन्न झाली आहे. आमदार, खासदारांनी सभागृहामध्ये याबाबत आवाजही उठविला; पण यावर केवळ चौकशी समित्या नेमण्यात आल्या. संबंधित समित्यांनी अद्यापही अहवाल सादर केलेला नाही वा कुठे जमिनी परत घेण्याची कारवाई झाल्याचेही ऐकिवात नाही. विधानसभा, विधान परिषद तथा लोकसभेतही यावर प्रश्न उपस्थित केला गेला; पण कार्यवाही शून्यच आहे. यामुळे आता खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच या प्रकरणात चौकशीचे आदेश द्यावेत आणि संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी आर्य समाज आराधना मंदिरचे मंत्री ताराचंद चौबे व सदस्यांनी केली आहे. याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यामार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
भूदानातील जमिनीच्या घोळाची चौकशी करा
By admin | Published: March 21, 2017 1:21 AM