रामदास तडस : कामगार भवनातील सभेत विविध समस्यांवर चर्चापुलगाव : कामगारांची समस्या बिकट आहे. पंतप्रधानांनी असंघटित क्षेत्राच्या सेवानिवृत्त कामगारांसाठी सरसकट एक हजार रुपये मासिक निवृत्तवेतन ही घोषणा केली; पण लालफितशाहीत नियमांची पायमल्ली होत असल्याने हजारो कामगारांना आजही तुटपुंजे निवृत्तीवेतन मिळत असल्याच्या तक्रारी आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करण्यात येऊन निवृत्त कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.राष्ट्रीय मील मजदूर संघाच्या कामगार भवनात सभा घेऊन कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी न.प. अध्यक्ष मनीष साहु, विशेष अतिथी खा. रामदास तडस, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, राष्ट्रीय मील मजदुर संघाचे अध्यक्ष रामेश्वर वाघ, रा.कॉ. शहराध्यक्ष श्यामसुंदर देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर मोहोड, भाजप शहराध्यक्ष नितीन बडगे, कामगार नेते पुंडलिक पांडे, विजय निवल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले की, स्मशानभूमी जागेचा वाद लवकर मिटणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्नही शासन दरबारी लावून धरला आहे. औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न सुरू असून विजयगोपाल मार्गावरील जागेचा प्रस्ताव शासन दरबारी मांडला आहे. पुलगावला तहसीलचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत जयभारत टेक्सटाईल्स, सर्कस ग्राऊंड, कामगार समस्यांबाबत मान्यवरांनी भाष्य केले. खा. तडस यांचा रामेश्वर वाघ व सावरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आभार ओंकार धांदे यांनी मानले. सभेला माजी नगराध्यक्ष नारायण कादी, नगरसेवक संजय गाते, काँग्रेसचे सुभाष लुंकड, मौला शरीफ, विजय भटकर, अशोक म्हात्रे, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
असंघटित कामगारांच्या सेवानिवृत्ती वेतनाची चौकशी करणार
By admin | Published: September 20, 2015 2:42 AM