ऑनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला. अनेक रूढी, परंपरा यांना फाटा देत नवीन मूल्य याद्वारे रूजविण्यात आले.पारस अनंत तांबेकर व दीपा विजय मसराम हे एका खासगी दवाखान्यात नोकरीला होते. दोघांची ओळख झाली. यातून जिव्हाळा निर्माण झाला. एकमेकांना समजून घेतले जात ४ ते ५ वर्षे गेली. अखेर सर्व विचारांती लग्नाचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे जात, धर्माच्या अडचणी निर्माण झाल्या. दोघांनीही आपापल्या कुटुंबाला विश्वासात घेत गैरसमज दूर केले. गजेंद्र सुरकार यांनी मुलीच्या कुटुंबासह मुला-मुलीचे विवाहपूर्व समुपदेशन केले. अखेर २६ फेब्रुवारी दिवस ठरला. या लग्नात कोणतेही कर्मकांड, रूढी न पाळता अक्षतांना फाटा देत फुलांचा वापर केला गेला.यावेळी अनेकांत स्वाध्याय मंदिरचे अध्यक्ष डॉ. महावीर पाटणी, सचिव सावळकर, विश्वस्त भागवतकर, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धीप्रिय कबीर औरंगाबाद, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, राष्ट्रसेवा दलाचे सचिव सोमनाथे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत केले तर वधू-वराचे स्वागत डॉ. महावीर पाटणी यांनी केले. यानंतर सारिका डेहनकर हिने वधू-वरांना सप्तपदी म्हणवून घेतल्या. यावेळी सर्वांनी पुष्प वर्षाव केला.सुनील सावध, भरत कोकावार यांनी वधू-वरांकडून शपथा म्हणवून घेतल्या. हारार्पणानंतर भीमसेन गोटे यांनी वधू-वरांकडून आभार वदवून घेतले. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन व महात्मा फुलेंचा अखंड, आम्ही प्रकाशबिजे हे गीत सादर करीत प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. आभार अनिल मुरडीव यांनी मानले. संचालन व विवाह सोहळा गजेंद्र सुरकार यांनी पार पाडला. कार्यक्रमाला अॅड. भास्कर नेवारे, संजय भगत, राजेंद्र ढोबळे, गोवर्धन टेभुर्णे, वैभव सुरकार, रेशमा सुरकार, निलेश घोडखांदे, एकनाथ डहाके, नितेश पाटील आदींनी सहकार्य केले. हा आगळा वेगळा विवाह पाहण्यास वर्धा शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
अंनिसद्वारे आंतरजातीय विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:59 PM
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला.
ठळक मुद्देमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल