बँका आणि कार्यालयातील व्यवहार ठप्प : वाहतूकदेखील प्रभावित, नागरिकांची कुचंबणावर्धा : दोन दिवसांपासून आर्वी नाका परिसरात नगर पलिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. पण गुरुवारी नाल्यांवरील अतिक्रमण काढताना बीएसएनएलचे केबल वायर तुटल्याने इंटरनेट सेवा खंडित झाली. परिणामी परिसरातील बँक आॅफ इंडियासह इतरही बँक आणि कार्यालयातील सेवा विस्कळीत झाली. बँकांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे व बँकांचे व्यवहारही खोळंबले. व्यवहारच होत नसल्याने या परिसरातील बँक आॅफ इंडिया शाखेचे गेट बंद करून त्यावर लिंक फेल असल्याचा फलक लावण्यात आला. त्यामुळे बँकेच्या बाहेर बराच काळ गर्दी झाली होती. कालपासूनच हे व्यवहार ठप्प झाले आहे. लिंक सुरळीत होण्यात किती कालावधी लागणार हे सांगता येत नसल्याचे बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच इतर शाखेतून व्यवहार सुरू असल्याचीही माहिती दिली. अतिक्रमण काढताना इंटरनेट केबल वायर तुटल्याने बीएसएनएलद्वारे केबल जोडण्याचे कामही सुरू होते. पण जोपर्यंत तुटलेला मुख्य केबल वायर सापडत नाही तोपर्यंत ही सेवा पूर्ववत होणार नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच सदर काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचेही बोलले जात होते. अतिक्रमण काढले जात असल्याने रस्ते मोकळे होत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी नालीवरील रपटे तोडल्याने गैरसोयही होत आहे. तसेच सदर रपटे तोडत असतानाच इंटरनेटचे केबल तुटले आहे. त्यामुळे सदर रपटे तोडण्याची गरज काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहे. या परिसरात अनेक गैरशासकीय कार्यालये व व्यावसायिक आहेत. पण इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने त्यांची कामेही रखडली आहे. शिवाय सेवा पूर्ववत केव्हा सुरू होईल याचा नेम नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. भर दुपारी सदर अतिक्रमण काढण्यात येत असल्याने वाहतूकही विकळीत झाली होती. परंतु पोलीस व्यवस्था चोख असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.(शहर प्रतिनिधी)
अतिक्रमण काढताना इंटरनेट सेवा विस्कळीत
By admin | Published: January 23, 2016 2:15 AM